काँग्रेसला धक्का! गेहलोत, पायलट यांच्या विश्वासू नेत्यांचा पक्षाला रामराम; BJPमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:49 AM2024-03-20T08:49:32+5:302024-03-20T08:50:27+5:30

Rajasthan Lok Sabha Election 2024 BJP Vs Congress: राजस्थान काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला.

many congress leaders joining bjp in rajasthan cm bhajan lal sharma criticised congress party | काँग्रेसला धक्का! गेहलोत, पायलट यांच्या विश्वासू नेत्यांचा पक्षाला रामराम; BJPमध्ये प्रवेश

काँग्रेसला धक्का! गेहलोत, पायलट यांच्या विश्वासू नेत्यांचा पक्षाला रामराम; BJPमध्ये प्रवेश

Rajasthan Lok Sabha Election 2024 BJP Vs Congress: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत असून, गळती थांबताना दिसत नाही. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला हात सोडला असून, हाती कमळ घेतले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. 

राजस्थानमध्ये लोकसभेच्या १२ जागांवर पहिल्या टप्प्यासाठी १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून, नामांकन भरण्याची प्रक्रिया २० मार्चपासून सुरू करण्यात येत आहे. २८ मार्च रोजी नामांकन अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर ३० मार्च ही नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. नामांकन अर्जाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच बड्या नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी ही काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची काँग्रेसवर जोरदार टीका

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय असलेले हनुमान सिंह खांगटा आणि सचिन पायलटचे खास मानले गेलेले पप्पुराम डारा यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस ही एक बुडते जहाज आहे. अशा जहाजावर प्रवास करणे कुणालाही आवडणारे नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपाला केवळ २५ जागांवर विजय मिळणार नाही, तर मतांची टक्केवारीही वाढलेली दिसेल. मोठ्या फरकाने उमदेवार विजयी होतील. तसेच केंद्रातही भाजपा ४०० पार नक्की करेल, असा विश्वास भजनलाल शर्मा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातही काँग्रेसला असेच अनेक धक्के बसले होते. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता असेच काहीसे चित्र राजस्थानमध्ये पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातूनही अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपासह महायुतीत प्रवेश केला आहे.
 

Web Title: many congress leaders joining bjp in rajasthan cm bhajan lal sharma criticised congress party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.