विलास शिवणीकरलोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : बिकानेर म्हटले की, चटपटीत भुजियाची आठवण येते अन् तोंडाला पाणी सुटते. येथील खाद्यपदार्थांची देश- विदेशात ख्याती आहे. याच बिकानेरमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले आहे. २००४ मध्ये बॉलिवूड स्टार धर्मेंद्र हे याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते. या बहुचर्चित बिकानेर मतदारसंघात यंदा भाजपकडून पुन्हा केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसने गोविंद राम मेघवाल यांना रिंगणात उतरविले आहे.
गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे अर्जुन राम मेघवाल यांनी काँग्रेसचे उमेदवार मदन गोपाल मेघवाल यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात येथे मतदान होणार आहे. अर्जुनराम मेघवाल हे पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीसह निवडणूक रिंगणात पुन्हा उतरले आहेत. कार्यकुशलता ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे गोविंद राम मेघवाल लढत देत आहेत. भाजपमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गोविंद राम मेघवाल यांनी २००३ मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक जिंकली होती. नंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. बसपाने येथून खेताराम मेघवाल यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
पाकिस्तान सीमेला हा भाग लागून आहे. पाणी, परिवहन या येथील समस्या आहेत. जयपूर, जोधपूर, कोटा, उदयपूरच्या तुलनेत बिकानेर विकासाच्या बाबतीत मागे आहे. पर्यटन क्षेत्र असूनही सोलर हब, रेल्वे सेवा विस्तार आदी प्रश्न येथे अनुत्तरीत आहेत. बेरोजगारीची समस्याही आहे. राजा महाराजांचा कधीकाळी या ठिकाणी प्रभाव हाेता. काँग्रेस पक्ष या मतदारसंघात दरवेळी नवा उमेदवार देत आलेला आहे. या मतदारसंघातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.