नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत रविवारी सकाळी मोठा पाऊस सुरू होता. त्यामुळे, विमानांचे उड्डाण करण्यासाठी दिल्ली एअरपोर्ट अथॉरिटीला त्रास सहन करावा लागला. आंतरराष्ट्रीय आणि घरेलु विमानांच्या टेक ऑफ आणि लँडींगसाठी अडचणी येत होत्या. दरम्यान, खराब वातावरणामुळे लंडनहून दिल्लीला येत असलेल्या AI-112 विमानाला दिल्लीत उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, ते विमान आकाशात घिरट्या मारत होते, अखेर जयपूरच्या दिशेने ते रवाना करण्यात आले.
एयर इंडियाच्या विमानानंतर बहरीनहून दिल्लीला येत असलेल्या गल्फ एअर लाईन्सच्या फ्लाइट GF-१३, दुबईहून दिल्ली येत असलेल्या एअर इंडियाच्या AI-९४८, गुवाहाटीहून दिल्ली येणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइट SG-८१६९ आणि पुणे ते दिल्ली येणाऱ्या फ्लाइट SG-८१८४ या विमानांनाही जयपूरकडे वळवण्यात आले.
जयपूर एअरपोर्टवरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एअरपोर्टकडून परवानगी मिळाल्यानंतर २ तासांनी एक-एक करत जयपूरहून ही विमाने दिल्लीकडे रवाना करण्यात आली. मात्र, लंडनहून दिल्लीकडे आलेल्या एअर इंडियाचे विमान AI-११२ हे तीन तासांपासून तिथेच उभे होते. कारण, पायलटने दिल्लीचे उड्डाण भरण्यास नकार दिला होता. माझी ड्युटी संपली असून मी विमान घेऊन जाणार नाही, असा पवित्रा विमानाच्या पायलटने घेतला होता. विशेष म्हणजे तसे बोलून तो विमानातून खालीही उतरला.
विमान पायलटच्या या हट्टामुळे पहाटे ४ वाजता दिल्लीत पोहोचणारे विमान काही तास जयपूर एअरपोर्टवरच उभे होते. तब्बल ५ तास यातील प्रवाशी ताटकळत बसले होते. त्यामुळे, प्रवाशांना मोठा त्रास, मनस्ताप सहन करावा लागला. अखेर, ५ तासांनी या विमानातील तब्बल ३५० प्रवाशांना बायरोड, रस्तेमार्गे दिल्लीला नेण्यात आले. तर, विमान दिल्लीला नेण्यासाठी दुसऱ्या क्रु मेंबर्सची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर, काही प्रवाशांसमवेत हे विमान दिल्लीकडे झेपावले.
दरम्यान, वैमानिकांच्या ड्युटीवेळेनुसार जयपूरमध्ये विमानाचे लँडींग झाल्यानंतर त्यांची ड्युटी समाप्त झाली होती. प्रवाशांची सुरक्षा आणि वैमानिकांचीही सुरक्षा लक्षात घेऊनच विमान अथॉरिटी नियमांचे पालन करते, त्यामुळे, संबंधित पायलटने विमानाचे उड्डाण केले नाही, असे एअर इंडियाने म्हटले आहे.