नागौर : राजस्थानमधील नागौरचे खिंवसरचे आमदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (आरएलपी) नेते हनुमान बेनिवाल यांच्या जीवाला धोका असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कोणापासून हनुमान बेनिवाल यांच्या जीवाला धोका आहे, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र शुक्रवारी रात्री अचानक त्यांचा सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. त्यांच्या घरी आठ सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय, त्यांची एस्कॉर्ट व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे.
दरम्यान, गुप्तचर पोलिसांना शुक्रवारी या संदर्भात काही माहिती मिळाली होती. त्यांच्या मते हनुमान बेनिवाल यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. ही माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर हनुमान बेनिवाल यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना समजले की, हनुमान बेनिवाल हे जयपूरहून नागौरला रवाना झाले. त्यानंतर पोलिसांनी मध्येच रस्त्यात हनुमान बेनिवाल यांना एस्कॉर्ट देण्यास सुरुवात केली.
हनुमान बेनिवाल जयपूरहून नागौर येथील आपल्या घरी पोहोचेपर्यंत विविध पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना कडेकोट सुरक्षा पुरवली. पोलिसांची अनेक वाहने हनुमान बेनिवाल यांच्या ताफ्यामागे धावत होती. एवढेच नाही तर हनुमान बेनिवाल संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले, तेव्हा त्यांच्या घरी नागौर पोलिसांचे क्यूआरटीचे 8 कमांडो तैनात होते.
हनुमान बेनिवाल यांच्याकडे आधीच सुरक्षा कर्मचारी आहेत, मात्र आता आणखी आठ कमांडो तैनात करण्यात आले आहेत. जेणेकरून कोणीही त्यांच्या घरात परवानगीशिवाय प्रवेश करू नये. दरम्यान, हनुमान बेनिवाल यांना कोणापासून धोका आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, हा धोका गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, हनुमान बेनिवाल हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांची प्रतिमा दबंग नेत्याची आहे.