'प्रत्येक योजनेत 85 टक्के कमिशन, काँग्रेसने सर्वांना एकसमान लुटले', PM मोदींची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 06:09 PM2023-05-31T18:09:38+5:302023-05-31T18:13:09+5:30
'देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. पण काँग्रेसने भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली.'
अजमेर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, बुधवारी (31 मे) राजस्थानच्या अजमेर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते अनेक शहरांमध्ये रॅली काढून आपल्या कामाची माहिती देत आहेत. मोदींनी राजस्थानमधील पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात दर्शन घेऊन सभांना सुरुवात केली. यानंतर अजमेर येथील रॅलीतून काँग्रेसवर जोरदार टीका केली.
अजमेरमधील रॅलीदरम्यान राजस्थान भाजपचे प्रमुख सीपी जोशी यांनी पगडी घालून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात देवी अहिल्याबाई होळकर यांनाही आदरांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या 9 वर्षातील कामांची माहिती देताना विरोधकांवरही हल्लाबोल केला. 2014 पूर्वीची देशातील परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये रोज हल्ले व्हायचे, महिलांवर अत्याचार व्हायचे. पंतप्रधानांवर वेगळे राज्यकर्ते होते. पूर्वी योग्य निर्णय घेतले गेले नाहीत, धोरणेही ढिसाळ होती, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
एका मताने किती बदल झाले?
पीएम मोदी पुढे म्हणाले की, 2014 मध्ये जनतेच्या एका मताने विकासाचा निर्णय घेतला गेला. त्याचाच परिणाम म्हणजे आज जगभरात भारताचे कौतुक होत आहे. आज जगातील नामवंत तज्ज्ञ सांगत आहेत की, आज भारत गरिबी संपवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. हा बदल एका मताने आला आहे. 50 वर्षांपूर्वी काँग्रेसने देशातील गरिबी हटवण्याची हमी दिली होती. गरिबांशी काँग्रेसचा हा सर्वात मोठा विश्वासघात आहे. हमी देणे ही या पक्षाची जुनी सवय आहे. गरिबांना फसवायचे, गरिबांसाठी नुसती तळमळ दाखवायची हे काँग्रेसचे धोरण आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मोदींकडे पैसा कुठून येतो?
केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. भाजप सरकारची ही 9 वर्षे देशवासीयांच्या सेवेसाठी, सुशासनासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. आज विरोधक प्रश्न विचारतात की मोदींकडे पैसा कुठून येतो. आपल्या देशात विकास कामांसाठी कधीही पैशांची कमतरता भासली नाही. सर्व पैसा विकासात खर्च करणे आवश्यक आहे. पण यापूर्वी काँग्रेसने अशी भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली होती जी देशाला पोकळ बनवत होती.
85 टक्के कमिशनसह काँग्रेस
आपल्या भाषणादरम्यान पीएम मोदींनी राजीव गांधींच्या भाषणाचाही उल्लेख केला, ज्यामध्ये ते म्हणाले होते की, जर सरकार 1 रुपया पाठवला तर नागरिकांपर्यंत पोहचत नव्हता. 85 टक्के कमिशन घेण्याची काँग्रेसची सवय जुनी आहे. गेल्या 9 वर्षात भाजप सरकारने आधुनिक महामार्ग आणि रेल्वेवर सुमारे 24 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. पण इथे काँग्रेस असती तर मधेच तो पैसा लुटला गेला असता. लुटमारीचा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेस कोणाशीही भेदभाव करत नाही. काँग्रेसने देशातील प्रत्येक नागरिकाची लूट केली. त्यांच्यासाठी गरीब, शोषित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, अपंग सर्व समान आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.