चार राज्यांमध्ये आता चित्र स्पष्ट होत चालले आहे. तीन राज्यांत भाजपा जिंकत आहे तर एका राज्यात काँग्रेसला यश मिळत आहे. असे असताना या दोन्ही पक्षांपैकी कोणाचा तरी उमेदवार जिंकला हे जाहीर व्हायला हवे होते. परंतू, तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराने पहिला विजय नोंदविला आहे.
राजस्थानमधून पहिला विजय नोंदविण्यात आला आहे. राजस्थानच्या चोरासी सीटचा निकाल जाहीर झाला आहे. राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार बनणार आहे. असे असताना बाप पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. भाजपा सध्या या राज्यात १११ जागांवर पुढे आहे.
राजकुमार रोत हे चोरासी सीटवरून जिंकले आहेत. भारत आदिवासी पार्टीचे राजकुमार रोत यांना 1,11,150 मते, भाजपच्या सुशील कटारा यांना 41,984 मते आणि काँग्रेसच्या ताराचंद भगोरा यांना 28120 मते मिळाली आहेत. आपच्या उमेदवाराला केवळ १९१४ मते मिळाली आहेत.
भारत आदीवासी पार्टी असे या पक्षाचे नाव आहे. काही वेळापूर्वी चार जागांवर बापने आघाडी घेतली होती. तीन महिन्यांपूर्वीच या पक्षाची स्थापना झाली होती. या पक्षात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हजारो आदिवासी समुदायाचे सदस्य सहभागी झाले होते. या पक्षाचे अध्यक्ष मोहनलाल रोट हे आहेत. 2020 च्या राजकीय संकटाच्या वेळी काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून भारतीय आदिवासी पक्ष (BTP) अंतर्गत वादंग झाला होता. यानंतर मोहनलाल हे वेगळे झाले होते. बीटीपी हा मुळची गुजरातचा पक्ष आहे.