नवी दिल्ली : उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत आहे. राजस्थानात भीषण गर्मीमुळे एकाच दिवसांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. बाडमेरमध्ये तर पारा ४८.८ अंश सेल्सिअसवर पाेहाेचला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे महिनाभरात म्यानमार, बांगलादेश आणि थायलँडमध्ये गेल्या महिनाभरात १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील इतर ठिकाणी पारा ५० अंश सेल्सिअसवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जालौरमध्ये एका महिलेसह दोन ज्येष्ठ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. आहोर आणि बालोतरा येथे दोन तरुणांचा मृत्यू झाला. राजस्थानशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, हरयाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे़ काही ठिकाणी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.
बांगलादेशात सलग २६ दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. बुधवारी देशात तापमान ४४ अंशांवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ७ अंशांनी अधिक आहे. येथे आतापर्यंत उष्मघातामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच म्यानमार आणि थायलंडमध्येही उष्णतेमुळे ४० हून अधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.
पाकिस्तानला आता उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे. येथील मोहेंजोदारो शहराचे तापमान ४८ अंशांवर पोहोचले आहे. देशभरात उष्णतेमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ मे पर्यंत शाळाही बंद ठेवण्यात आल्या असून, रुग्णालयांना हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.
एवढी भीषण उष्णतेची लाट कशामुळे?- अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार अनेक देशांमध्ये रात्रीच्या वेळीही उष्णतेची लाट आहे. मे महिन्यात रात्रीचे सरासरी तापमान दिवसाप्रमाणे वाढत आहे. - दक्षिण आशियामध्ये उष्णतेच्या लाटेचा धोका ४५ पटीने वाढला आहे. दुसरीकडे, पश्चिम आशियामध्ये सीरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉनमध्ये हा धोका ५ पट वाढला आहे. २२ मे रोजी भारतातील ९ शहरांमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. - आशियातील प्राणघातक उष्णतेच्या लाटेचे हे सलग तिसरे वर्ष आहे. याचे एक कारण म्हणजे एल निनो. पाकिस्तानातील जेकबाबाद येथे सर्वाधिक तापमान होते. तेथे पारा ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.