PM Modi Praises Kharge: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या देवगडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे कौतुक करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी खर्गेचे वर्ण दलित कुटुंबातील मुलगा, असे करत काँग्रेस त्यांच्याशी गैरवर्तन करत असल्याची टीका केली.
पीएम मोदी म्हणाले, मी मल्लिकार्जुन खर्गेंचा मुद्दा उपस्थित केला होता. एका दलित कुटुंबातील मुलगा आज काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ निवडणुका जिंकून देशाची सेवा करणाऱ्यांपैकी ते एक आहे. मी काल जयपूरमध्ये रोड शो करत होतो, काँग्रेस पक्षाध्यक्षांचा कुठेच फोटो दिसत नव्हता. सगळीकडे अशोक गेहलोत, राजघराण्यातील अनेक लोक दिसत होते. काँग्रेस दलित आईच्या मुलाला अशी वागणूक देते. काँग्रेसला दलितांशी काही देणंघेणं नाही, अशी टीका मोदींनी यावेळी केली.
मोदी पुढे म्हणाले की, कालपासून काँग्रेसचे राजघराणे माझ्या मागे लागले आहे. काँग्रेस राजेश पायलट यांच्या संदर्भात एक निवेदन जारी करत आहे. पण माझ्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. काँग्रेसने राजेश पायलटांचा कधीही अपमान केला नाही, असे काँग्रेस पूर्ण ताकदीने सांगत आहे, पण मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देत नाही.
आजपर्यंत राजस्थानने यापेक्षा जास्त महिला विरोधी सरकार पाहिले नाही. त्यामुळेच राजस्थानच्या जनतेने काँग्रेस सरकार उलथून टाकण्याचा संकल्प केला आहे. गेहलोत सरकार राजस्थानात कधीही परतणार नाही. राजस्थानची भूमी शूर स्त्री-पुरुषांची भूमी आहे, पण काँग्रेस सरकारने माता, बहिणी आणि मुलींवरील अत्याचाराच्या बाबतीत राजस्थानला नंबर वन बनवले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मोदी पुढे म्हणतात, स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठा घोटाळा झाला, तोही आपल्या देशातील शूर सैनिकांसाठी खरेदी केलेल्या वस्तुंचा. बोफोर्स घोटाळा देश कधीही विसरू शकत नाही. काँग्रेसने पाणबुडी घोटाळा केला, हेलिकॉप्टरमध्ये घोटाळा केला. पाणी असो, आकाश असो, जमीन असो… काँग्रेसचा पंजा एकच काम करतो, फक्त लुटमार. काँग्रेसने फक्त सैनिकांचा विश्वासघात केला नाही, तर 'वन रँक वन पेन्शन' झुलवत ठेवले. भाजप सरकारने तुम्हाला ‘वन रँक वन पेन्शन’ची हमी दिली होती आणि ती हमी पूर्ण झाली आहे, असंही ते यावेळी म्हणाले.