PM Modi Rajasthan Visit: नकारात्कम विचाराच्या लोकांना देशाचा विकास नकोय; राजस्थानमधून पीएम मोदींचा काँग्रेसवर प्रहार...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 02:39 PM2023-05-10T14:39:41+5:302023-05-10T14:41:45+5:30
PM Modi Rajasthan Visit: नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत.
राजसमंद: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(बुधवारी) राजस्थानच्या एक दिवसीय दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी नाथद्वारातील श्रीनाथजी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर पीएम मोदी दामोदर स्टेडियमवर पोहोचले आणि 5500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. राजस्थान हे भारताच्या शौर्याचे, वारशाचे आणि संस्कृतीचे वाहक आहे आणि राजस्थानचा जितका विकास होईल तितका भारताच्या विकासाला गती येईल, असे मोदी यावेळी म्हणाले.
केंद्र सरकार राज्यात रस्ते, रेल्वे, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सुविधांचा समावेश असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांवर भर देत असल्याचे ते म्हणाले. राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासाच्या मंत्रावर आमच्या सरकारचा विश्वास असल्याचे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. पंतप्रधान म्हणून मोदी पहिल्यांदाच श्रीनाथजी मंदिरात पोहोचले होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे मानले जात आहे.
राज्यांच्या विकासातून देशाच्या विकासावर विश्वास ठेवणाऱ्या आमच्या सरकारला राजस्थानच्या विकासामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ते म्हणाले की, लोकांचे जीवन सुसह्य करणे हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, आज देशात अभूतपूर्व गुंतवणूक होत आहे, सर्व कामे अभूतपूर्व गतीने होत आहेत आणि आमचे सरकार रेल्वे, महामार्ग, विमानतळ अशा प्रत्येक क्षेत्रात जलद गतीने काम करत आहे.
राजस्थान में जनता-जनार्दन के प्रेम और स्नेह से अभिभूत हूं। आबू रोड में एक विशाल जनसभा को संबोधित कर रहा हूं। जरूर देखिए! https://t.co/fvIhmhPDO5
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2023
'नकारात्मक विचारा असलेल्यांना विकास नकोय'
यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशातील काही लोक इतके नकारात्मकतेने भरलेले आहेत की, त्यांना देशात काहीही चांगले घडलेले आवडत नाही. शाश्वत विकासासाठी मूलभूत व्यवस्थेसोबत आधुनिकतेचा समावेश करणे आवश्यक आहे. जे लोक प्रत्येक गोष्ट मतांच्या तराजूने तोलतात, ते देशाचे भविष्य लक्षात घेऊन कल्याणकारी योजना करू शकत नाहीत. या नकारात्मक विचारसरणीमुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले गेले नाही.
पंतप्रधान पुढे म्हणाले की, जर आपल्या देशात वैद्यकीय महाविद्यालये आधीच सुरू झाली असती तर डॉक्टरांची कमतरता भासली नसती, रेल्वे मार्गांचे आधीच विद्युतीकरण झाले असते तर आज हजारो कोटी रुपये खर्च करावे लागले नसते, जर आधी पाणी आले असते, तर आज जल जीवन मिशन सुरू करण्याची गरज नाही. नकारात्मकतेने भरलेले लोक राजकीय स्वार्थापलीकडे विचार करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.