राजस्थानमध्ये राजकीय नाट्य; ED च्या छापेमारीनंतर मंत्रीमहोदय म्हणतात- मी घाबरणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 04:25 PM2023-09-27T16:25:00+5:302023-09-27T16:25:23+5:30
नक्की प्रकरण काय? का मारले छापे, जाणून घ्या सविस्तर...
ED in Rajasthan, Minister Rajendra Yadav: राजस्थानमधील मध्यान्ह भोजन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या कारवाईने गेहलोत सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. मंत्री राजेंद्र यादव यांच्या निवासस्थानावर ईडीने छापा टाकला आहे. मंत्र्यांनी याला काँग्रेसविरोधातील जाणीवपूर्वक केलेली कारवाई म्हटले आहे. मध्यान्ह भोजनातील अनियमिततेबाबत गेहलोत सरकारचे मंत्री राजेंद्र यादव यांच्या कोटपुतली येथील निवासस्थानावर ईडीच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईनंतर मंत्री राजेंद्र यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. "ईडीच्या माध्यमातून मला त्रास देण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे, पण मी घाबरणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहीन. मध्यान्ह भोजनाच्या गोंधळाशी माझा काहीही संबंध नाही", असे स्पष्ट शब्दांत यादव म्हणाले.
गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या निवासस्थानी ईडीने ही कारवाई केली. काय कारवाई केली याचा खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने मंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. यावेळी मंत्री राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ईडीच्या २४ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन कपाट आणि बॉक्सचे कुलूप तोडले. ज्यामध्ये ईडीला काही कागदपत्रे मिळाली आहेत. या काळात ईडीची कारवाई दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होती. मात्र, ईडीच्या पथकाला मंत्र्याविरुद्धच्या कारवाईत किंवा माध्यान्ह भोजन योजनेतील अनियमिततेबाबत कोणते महत्त्वाचे क्लूस मिळाले आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.
ईडीची दुसरी मोठी कारवाई
मंत्री यादव यांचा विभाग हा कौटुंबिक शिक्षण आणि अन्न पुरवठा व्यवसायाशी संबंधित आहेत. याबाबत गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजीही प्राप्तीकर विभागाने गृहराज्यमंत्री यादव यांच्याशी संबंधित ५३ ठिकाणी छापे टाकले होते. यापैकी कोटपुतली येथे राजस्थान फ्लेक्सिबल पॅकेजिंग फॅक्टरी नावाची कंपनी आहे. ज्यामध्ये मंत्री यादव यांनी कंपनीचे पद भूषवले आहे. सध्या राजेंद्र यादव यांचा मोठा मुलगा मधुर यादव हे या कंपनीचे व्यवस्थापक आहेत. याशिवाय यादवचे दिल्ली, गुरुग्राम आणि उत्तराखंडमध्ये पॅकेजिंग प्लांट आहेत. ही आयकर विभागाने यादव यांच्यासंदर्भात केलेली दुसरी मोठी कारवाई आहे.