“निवडणुकीत भाजपचा साधा मागमूसही नाही, ED अन् काँग्रेसमध्येच थेट मुकाबला”: अशोक गेहलोत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 11:39 AM2023-11-05T11:39:27+5:302023-11-05T11:43:30+5:30
Rajasthan Assembly Election 2023: ईडीच्या आडून लढण्यापेक्षा थेट सामोरे येऊन आमच्याशी लढून दाखवा, असे खुले आव्हान अशोक गेहलोत यांनी ईडीला दिले.
Rajasthan Assembly Election 2023: राजस्थान विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. काँग्रेस सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून, भाजप पुनरागमन करण्यास मोठ्या प्रमाणात इच्छूक आहे. राजस्थानमधील जनता कुणाच्या पारड्यात कौल टाकते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. अशातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवायांवरून पुन्हा एकदा टीका केली आहे. या निवडणुकीत भाजप कुठेच दिसत नाही. राजस्थानमधील निवडणूक ईडी विरोधात काँग्रेस अशीच आहे, असा खोचक टोला अशोक गेहलोत यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक गेहलोत यांच्या पुत्राला नोटीस बजावली होती आणि चौकशीस हजर राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच काँग्रेस नेत्यांच्या घरी छापेमारी केली होती. भीलवाडा येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ईडीच्या छापेमारीवरून भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राजस्थानमध्ये काँग्रेस विरुद्ध ईडी अशी लढत आहे. ईडी राजस्थान राज्याच्या हात धुवून मागे लागली आहे. मला दोनदा दिल्लीला बोलावण्यात आले. माझ्या मुलाला दिल्लीला बोलावले आहे. कोणतीही केस नाही, एफआयआर नाही, तक्रार नाही. तक्रार करणारे भाजपचे आहेत, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.
निवडणुकीत भाजप कुठेही दिसत नाही
या निवडणुकीत भाजप कुठेही दिसत नाही. इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांनी आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी. विजय मल्ल्याप्रमाणेच लंडनमध्ये बसलेले नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी अनेक वर्षांपासून फरार आहेत. तुम्ही सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर करत आहात. निवडून आलेली सरकारे पडली तर लोकशाहीचे काय होईल? ही पद्धत नाही. ईडीच्या माध्यमातून आमच्याशी लढत आहेत. हिंमत असेल तर थेट स्पर्धा करा, असे आव्हान अशोक गेहलोत यांनी भाजपला दिले. मुलगा वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावत हजर राहण्याचे निर्देश दिले, त्यावेळीही अशोक गेहलोत यांनी निशाणा साधला होता. देशभरात ईडीने दहशत माजवली आहे. प्रश्न केवळ राजस्थान प्रदेशाध्यक्षांवर छापेमारी किंवा माझ्या मुलाला नोटीस बजावल्याचा नाही. छत्तीसगडमध्ये तर अनेक कुटुंबांनी ईडीच्या भीतीने स्थलांतर केले आहे, असे दावा अशोक गेहलोत यांनी केला होता.
दरम्यान, देशभरातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता त्यात बदल करून २५ नोव्हेंबर तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ०३ डिसेंबरला लागणार आहे.