Rajasthan Assembly Election 2023: २५ नोव्हेंबर रोजी राजस्थानात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री राजस्थानात प्रचार करत आहेत. राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप यांच्यात काँटे की टक्कर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. एकदा विधानसभा निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी पुढील ५ वर्ष राजस्थानात दिसतीलच असे नाही, या शब्दांत गेहलोत यांनी निशाणा साधला.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एका प्रचारसभेत संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्यानंतर पाच वर्षे राजस्थानमध्ये येणार, याची पंतप्रधान नरेंद्र मोदी हमी देऊ शकतील का, अशी विचारणा अशोक गेहलोत यांनी केली. यावेळी काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल, याचा पुनरुच्चार अशोक गेहलोत यांनी केला. राजस्थानमध्ये पुन्हा जादू चालेल. राजस्थानच्या सर्व जागांवर मीच निवडणूक लढवत आहे, असाच विचार जनतेने करावा आणि राज्याच्या हितासाठी काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून आणावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले.
लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे
राजस्थानात लाल डायरीवरून राजकीय वातावरण तापले होते. पंतप्रधान मोदी यांनीही लाल डायरीचा उल्लेख करून काँग्रेसवर टीका केली होती. यावर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, लाल डायरीतील मुद्दे निव्वळ मूर्खपणाचे आहे. जर आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर सदर लाल डायरी ही ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआयकडे सोपवावी, असे आव्हान गेहलोत यांनी दिले. कन्हैया लाल हत्या प्रकरणातील आरोपींना आतापर्यंत फाशी द्यायला हवी होती, परंतु एनआयएचा तपास ज्या प्रकारे व्हायला हवा होता, त्या पद्धतीने होत नाही, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.
दरम्यान, काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली. आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदींनी हल्लाबोल केला होता.