CM Ashok Gehlot: राजस्थानात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस सरकार कायम राहण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर भाजप काँग्रेसला चितपट करण्यासाठी ताकद पणाला लावताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर टीका केली असून, राजस्थानमधील जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसचे सरकार हवे आहे. काँग्रेसचा विजय होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जयपूर येथे बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, स्थानिक प्रश्न आणि विकासावर निवडणूक लढवत आहोत. भाजप आमच्या धोरणांवर बोलत नाही. ते केवळ खोटे आरोप करत आहेत. मला वाटते की, भाजपवाले घाबरलेत. जनतेला पुन्हा हेच सरकार निवडून द्यायचे आहे. जनता याच सरकारची पुनरावृत्ती करण्याच्या मनस्थितीत आहे. आम्ही हमीभाव, विकास, सुशासन आणि शेतकऱ्यांसाठी केलेले क्रांतिकारी कायदे या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत. मात्र, यावर भाजपकडे उत्तर नाही. भाजपकडे सांगण्यासारखे काही राहिलेले नाही. म्हणूनच ते असे खोटे आरोप करत आहेत, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी हल्लाबोल केला.
गेल्या ३० वर्षांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झाला नाही
गेल्या ३० वर्षांत गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान झाला नाही. हे कुटुंब ३० वर्षांपासून कोणत्याही पदाशिवाय आहे, ते फक्त काँग्रेस पक्ष सांभाळत आहेत, असे असताना त्यांच्या पोटात का दुखत आहे? गांधी कुटुंबाला टार्गेट का करता? त्यांनी आम्हाला टार्गेट करावे, आम्ही येथे काम करतो. ते गांधी परिवाला का घाबरतात? याचाच अर्थ असा की, गांधी कुटुंबाची विश्वासार्हता देशात सर्वाधिक आहे, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांत काँग्रेस पाचपैकी चार राज्यांत विजयी होण्याची शक्यता आहे, असा दावा सचिन पायलट यांनी केला आहे. २०२४ साली लोकसभा निवडणुकांत देशात वारे कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत याचे दर्शन विधानसभा निवडणूक निकालांतून होणार आहे, असेही सचिन पायलट म्हणाले.