आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ३३ उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या यादीत पाच मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार एससी, चार एसटी आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे.
याचबरोबर काँग्रेसने दोन आमदारांची तिकिटे कापली केली आहेत. यामध्ये चित्तोडमधून चंद्रभान सिंह आणि सांगानेरमधून अशोक लाहौती यांना तिकीट दिले नाही. तसेच, संतोष अहलावत यांना सूरजगडमधून तिकीट देण्यात आले आहे. २०१३ मध्ये त्यांनी सूरजगडमधूनच विधानसभा जिंकली होती. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचे लोकसभेचे तिकीट रद्द करण्यात आले होते तर २०१४ मध्ये त्या झुंझुनूमधून खासदार म्हणून निवडणून आल्या होत्या.
गोविंद सिंह दोतासरा लाच्छमनगडमधून तर मुकेश भाकर लाडनूनमधून निवडणूक लढवणार आहेत. बायतूमधून हरीश चौधरी, मालवीय नगरमधून अर्चना शर्मा आणि नाथद्वारातून सीपी जोशी यांना तिकीट देण्यात आले आहे. दिव्या मदेरणा यांना ओसियनमधून तिकीट मिळाले आहे. दरम्यान, शांती धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड या तीन नेत्यांची नावे उमेदवारांच्या यादीत नाहीत. पक्षाने त्यांना नोटिसा बजावल्या असून या नेत्यांशी संबंधित जागांसाठी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
काँग्रेसच्या यादीत समाविष्ट असलेल्या ३३ नावांपैकी ३२ उमेदवारांची नावे जुनी आहेत. पक्षाने मुंडावार मतदारसंघातून ललित यादव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मागची निवडणूक बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) तिकिटावर लढवली होती. काँग्रेसच्या पहिल्या यादीत सचिन पायलट गटातील चार नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. इंद्रसिंग गुर्जर यांना विराटनगरमधून, रामनिवास गवारिया यांना परबतसरमधून आणि अमित चचन यांना नोहर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपने ८३ उमेदवारांची जाहीर केली दुसरी यादी भाजपनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपची ही दुसरी यादी असून त्यात ८३ उमेदवार आहेत. यापूर्वी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ४१ उमेदवार होते. भाजपच्या दुसऱ्या यादीत अनुसूचित जातीच्या १५ जणांना स्थान मिळाले आहे. १० महिलांना तिकीट देण्यात आले असून १० अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.