राजस्थानात आता निवडणुका झाल्यास कोणाचे सरकार येईल? काँग्रेसला धक्का, BJP कमबॅकचे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 12:00 PM2023-11-02T12:00:15+5:302023-11-02T12:04:17+5:30
Rajasthan Assembly Election 2023: आजच्या घडीला राजस्थानात निवडणुका झाल्या, तर कोण बाजी मारेल? ओपिनियन पोलमधून धक्कादायक आकडेवारी समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
Rajasthan Assembly Election 2023: आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी देशभरातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये राजस्थानचा समावेश असून, विद्यमान अशोक गेहलोत सरकार कायम राहणार की भाजप कमबॅक करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राजस्थानमध्ये प्रचाराला वेग आला असून, पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. यातच आजच्या घडीला राजस्थानमध्ये निवडणुका झाल्या, तर कोणाचे सरकार येईल, कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळेल, याचा सर्व्हे करण्यात आला होता. या ओपिनियन पोलमधून धक्कादायक आकडेवारी समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत २०२३ मध्ये कोणाचे सरकार स्थापन होईल, त्याचा निर्णय राज्यातील ५ कोटी २६ लाख ९० हजार आणि सहाशेहून अधिक मतदार घेणार आहेत. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पण आज मतदान झाले, तर राजस्थानची जनता कोणाला निवडून देईल, म्हणजेच राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल, याबाबत ओपिनियन पोलमध्ये प्रश्न विचारण्यात आले. या ओपिनियन पोलमध्ये राजस्थानमध्ये भाजपचा काँग्रेसवर वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये राजस्थानच्या राजकीय प्रथेची पुनरावृत्ती होताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे पारडे जड, पुन्हा करू शकेल सरकार स्थापन?
राजस्थान विधानसभेच्या २०० जागा आहेत. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला ११४-१२४ जागा मिळताना दिसत आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाला ६८-७८ जागा मिळताना दिसत आहे. तर आरएलपी, आप आदी पक्षांना ६ ते १० जागा मिळताना दिसत आहेत. आज मतदान झाले तर राजस्थानमध्ये भाजपला एकूण मतांपैकी ४३.८० टक्के मते मिळतील. तर काँग्रेसला ४१.९० टक्के मते मिळू शकतात. इतर पक्षांची मतांची टक्केवारी १४.३० टक्क्यांच्या आसपास राहू शकेल. हा ओपिनियन पोल टाइम्स नाऊ नवभारत आणि ईटीजी यांच्याकडून घेण्यात आला.
दरम्यान, राजस्थानात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. गेहलोत सरकार सत्ता कायम राहावी, यासाठी प्रयत्न करत असून, भाजपने काँग्रेसला पराभूत करण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भाजपकडून मिळणारी वागणूक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत.