जयपूर : राजस्थानमध्ये वर्षअखेर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून जोरात सुरू झाली आहे. दरम्यान, राज्यातील सत्ताधारी काँग्रसचे गेहलोत सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाच, भाजप ५ वर्षांनंतर पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सभांना सुद्धा वेग आला असून दोन्ही पक्षांकडून दावे-आश्वासनांची उधळण सुरू आहे. दरम्यान, राज्यातील जनता सत्तेची चावी कोणाकडे सोपवणार, हे निवडणुकीचे निकाल आल्यानंतरच समजणार आहे. मात्र त्याआधीच एका वृत्तवाहिनीचा ओपिनियन पोल समोर आला असून, त्यात जनतेने राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी आणि देशाच्या पंतप्रधानपदासाठी पहिली पसंती कोणाला दिली आहे, ते जाणून घ्या....
राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार?ओपिनियन पोलमध्ये लोकांना राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांबद्दल विचारण्यात आले होते. राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, असा सवाल जनतेला करण्यात आला होता. यावर, अशोक गेहलोत हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असावेत, असे सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ३५ टक्के लोकांचे मत आहे. तर २५ टक्के लोकांना वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शविली आहे. याशिवाय, सचिन पायलट हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री व्हावेत, अशी १९ टक्के लोकांना इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर, ९ टक्के लोकांनी भाजप खासदार आणि केंद्रीय गजेंद्र सिंह शेखावत यांना मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असल्याचे सांगितले. या नेत्यांशिवाय सात टक्के लोकांना भाजपचे प्रवक्ते राज्यवर्धन सिंह राठोड यांना मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे.
पुढचा पंतप्रधान कोण असावेत?सर्वेक्षणात राजस्थानच्या लोकांना पंतप्रधानांच्या पहिल्या पसंतीबद्दल विचारण्यात आले. यावेळी ६३ टक्के लोकांनी सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपली पहिली पसंती असल्याचे सांगितले. तसेच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पंतप्रधान व्हावेत, अशी २० टक्के लोकांची इच्छा आहे. याशिवाय ६ टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तर २ टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाची पहिली पसंती असल्याचे सांगितले. तर ९ टक्के लोकांनी इतरांचे नाव घेतले आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?भाजपला एकूण १०९-११९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर काँग्रेसला ७८-८८ जागा मिळू शकतात. १-५ जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.