Sachin Pilot News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रचाराला वेग येत असून, आतापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आल्याचे दिसत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले होते. यानंतर आता मुख्यमंत्रीपदापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे, असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मला सोडण्यास तयार नाही, अशा आशयाचे विधान अशोक गेहलोत यांनी केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क केले जात आहेत. यासंदर्भात सचिन पायलट यांनी भाष्य केले. राजस्थानची जनता परंपरा मोडण्यास इच्छूक आहे. आमच्या पक्षाला पुन्हा संधी मिळेल. मुख्यमंत्री कोण होणार, यावर बोलताना, निवडणूक जिंकण्याला प्रथम प्राधान्य असल्याचे सचिन पायलट यांनी नमूद केले.
झाले गेले विसरून एकत्र काम करावे लागेल
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष सातत्याने चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळाला. यातच आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमधील संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. याबाबत सचिन पायलट यांनी बोलताना सांगितले की, मल्लिकार्जुन खर्गे मला म्हणाले की, तुला आता हे सगळे विसरावे लागेल. झाले गेले विसरून एकत्र काम करावे लागेल. माफ करून पुढे जावे लागेल. एकदा बोलला शब्द परत घेता येत नाही. मात्र, आता त्यापलीकडे जाऊन एकत्र काम करावे लागेल.
दरम्यान, सचिन पायलट पूर्णपणे निवडणूक प्रचारात गुंतले असल्याचे दिसत आहेत. काँग्रेसचे सरकार पुन्हा आल्यास तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळू शकेल का, या प्रश्नावर बोलताना, सध्या निवडणुका जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आधी निवडणुका जिंकू. मग काय होईल ते दिसेल. भारतीय जनता पक्षाची कोंडी झाली आहे. वसुंधरा राजे यांना त्यांच्याच पक्षात बाजूला केले जात आहे, असा दावा सचिन पायलट यांनी केला.