जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. राजस्थानच्या राजकारणात जादूगर म्हणून ओळख असणारे अशोक गहलोत राज्यातील दर पाच वर्षांच्या सत्ताबदलाचा ट्रेंड बदलणार का, याची उत्सुकता होती. मात्र हा ट्रेंड बदलण्यात ते यशस्वी ठरत नसल्याचं मतमोजणीच्या कलांवरून स्पष्ट होत आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत आणखी एका नेत्याची प्रचंड चर्चा झाली होती. ती म्हणजे काँग्रेसमधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केले माजी मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांची. गुढा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उदयपूरवाटी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. एकनाथ शिंदे हे स्वत: गुढा यांच्या प्रचारासाठी राजस्थानात गेले होते. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल महाराष्ट्रातही कुतूहल आहे. परंतु आतापर्यंतचे कल हे शिंदेंच्या शिवसेना समर्थकांना निराश करणारे आहेत. कारण उदयपूरवाटी मतदारसंघात राजेंद्र गुढा हे पिछाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार शुभकरण चौधरी यांनी आघाडी घेतली आहे. शुभकरण चौधरी यांना २५ हजार ६६१ मते मिळाली असून, शिवसेनेचे राजेंद्र सिंह गुढा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना १८ हजार ७२० मिळवण्यात यश आलं आहे. भाजपच्या उमेदवाराने ६ हजार ९४१ आघाडी घेतली असल्याने गुढा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र या जागेवर अजून मतमोजणी सुरू असून पुढच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे उमेदवार गुढा हे आघाडी घेण्यात यश मिळवतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लाल डायरी बाहेर काढत राजस्थानच्या राजकारणात घडवला होता भूकंप
राजेंद्र सिंह गुढा हे अशोक गहलोत सरकारमध्ये मंत्री होते. मात्र सरकारवर केलेल्या टीकेनंतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर गुढा हे एक लाल डायरी घेऊन थेट विधानसभेत पोहोचले आणि अशोक गहलोत यांच्या चुकीच्या कामांबद्दल गौप्यस्फोट करणाऱ्या अनेक गोष्टी या डायरीत नमूद असल्याचा दावा त्यांनी केला होता. या डायरीने राजस्थानचं राजकारण ढवळून काढलं होतं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा निवडणूक लढवली.