जयपूर : राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सत्ताधारी काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसमध्ये आणखी एका भाजप नेत्याचा प्रवेश झाला आहे. भाजपच्या नेत्या साध्वी अनादी सरस्वती यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्याचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. साध्वी अनादी सरस्वती यांचे खरे नाव ममता कलानी असून त्या मूळच्या सिंधी समाजातील आहे.
अजमेर उत्तर मतदारसंघातून भाजपचे दिग्गज मंत्री वासुदेव देवनानी यांच्या विरोधात काँग्रेस ममता कलानी यांना उमेदवारी देण्यार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या स्वातंत्र्यसैनिक हेमू कलानी यांच्या कुटुंबातून येतात. तसेच, राजस्थानच्या लेडी योगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साध्वी अनादी सरस्वती यांची राज्याच्या राजकारणावर चांगली पकड असलेल्या नेत्या असल्याचे म्हटले जाते. याशिवाय, अजमेर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून हिंदुत्वाचा प्रमुख चेहरा मानल्या जातात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यामुळे त्या प्रेरित आहेत.
बुधवारी साध्वी अनादी सरस्वती यांनी आपला राजीनामा भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि राजस्थान प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. ज्यामध्ये साध्वी अनादी सरस्वती यांनी काही अपरिहार्य कारणांमुळे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. मात्र, साध्वी अनादी सरस्वती यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अजमेर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतू भाजपने त्यांना तिकीट दिले नाही, त्यामुळे त्या नाराज होत्या. यानंतर त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेस त्यांना अजमेर उत्तरमधून तिकीट देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.