...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 01:45 PM2023-11-29T13:45:29+5:302023-11-29T13:46:19+5:30

राजस्थानात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंच्या जागी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

rajasthan assembly election Vasundhara Raje special plan to get Chief Minister post | ...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

जयपूर :राजस्थान विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सगळ्यांचं लक्ष ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. राजस्थानाची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे, तर काँग्रेसला पराभूत करत राजस्थानात आपलं सरकार येईल, असा भाजपचा दावा आहे. मात्र दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत ताकदीने लढवली असल्याने कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठणं शक्य होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून या अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी निकालाआधीच भाजप आणि काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनीही यासाठी कंबर कसली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून वसुंधरा राजेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा निवडणूक काळात राजस्थानच्या राजकीय वर्तुळात रंगत होती. भाजपला राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास आणि पक्षावर अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याची वेळ आल्यास वसुंधरा राजे पुन्हा एकदा गेमचेंजर ठरू शकतात. त्यामुळे वसुंधरा राजे यांनी आतापासून तयारी सुरू केली असून भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे समजते.

राजस्थानात कोणत्या पक्षात किती बंडखोर?

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागला. भाजपच्या ३२ तर काँग्रेसच्या २२ बंडखोरांनी निवडणूक लढवली. भाजपच्या ३२ बंडखोरांपैकी २० उमेदवार हे वसुंधरा राजे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. यातील डझनभर उमेदवार निवडणूक आले तर निकालानंतर ते वसुंधरा राजे मुख्यमंत्री व्हाव्यात, यासाठी मोर्चेबांधणी करू शकतात. 

२०१८ची पुनरावृत्ती होणार?

यंदा निवडणूक काळात वसुंधरा राजेंनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला होता. मात्र पक्षातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या आपल्या समर्थकांच्या मतदारसंघात त्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या नव्हत्या. या बंडखोरांपैकी जे उमेदवार निवडून येतील ते वसुंधरा राजेंना भाजपने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली तरंच ते पक्षासोबत येतील, अन्यथा त्यांच्यासमोर काँग्रेसचा पर्यायही असणार आहे. २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसलाही बहुमतासाठी बाहेरच्या एका आमदाराची गरज लागली होती. त्यामुळे सचिन पायलट यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा असतानाही अपक्षांची जमवाजमव करणाऱ्या अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद देण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय उरला नाही. यावेळी भाजपच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होऊन पक्ष बहुमतापासून दूर राहिल्यास आणि अपक्षांना सोबत घेण्याची गरज भासल्यास वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी चालून येणार आहे. त्यामुळे ही संधी दवडली जाऊ नये, यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून निकालात नेमकं काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: rajasthan assembly election Vasundhara Raje special plan to get Chief Minister post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.