Rajasthan Assembly: गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकाणात नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपल्याच सरकारविरोधात बोलल्यामुळे काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांना मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मंत्रिपदावरुन बाजुला केले. यानंतर गुढा यांनी सरकारविरोधात हत्यार उपसले आहे. सोमवारीही विधानसभेत सोमवारी प्रचंड गदारोळ झाला. यावेळी गुढा यांनी त्यांना मारहाण झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
आज राजस्थानच्या विधानसभेत विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी गोंधळ घालत कथित लाल डायरी दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच, सभापतींची परवानगी न घेता त्यांनी सभागृहात बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांचा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्याशी जोरदार वाद झाला. यानंतर अध्यक्षांच्या निर्देशानंतर मार्शलने त्यांना सभागृहाच्या बाहेर काढले.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर राजेंद्र गुढा मीडियासमोर रडले आणि सभागृहात त्यांना मारहाण झाल्याचा दावा केला. ते म्हणाले की, मला सभागृहात डायरी सादर करायची होती, जनतेचे प्रश्न मांडायचे होते. पण, माझ्यावर 50 जणांनी हल्ला केला, धक्काबुक्की आणि लाथ मारल्या. काँग्रेस नेत्यांनीच मला हाकलून लावले. माझ्यावर भाजपसोबत असल्याचा आरोप केला जातोय. माझा एकच प्रश्न आहे की, माझी चूक काय आहे? हवं तर माझी नार्कोटेस्ट करा, असं ते म्हणाले.
नेमकं काय प्रकरण?राजस्थान सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले राजेंद्र गुढा यांनी काही दिवसांपूर्वी सभागृहात आपल्याच सरकारविरोधात वक्तव्य केले होते. राजेंद्र गुढा म्हणाले होते की, फक्त मणिपूरबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाही. आम्हीही आमच्या राज्यात महिलांना योग्य सुरक्षा देऊ शकत नाही. या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तात्काळ राजेंद्र गुडा यांची हकालपट्टी केली. राजेंद्र गुढा यांच्याकडे राजस्थान सरकारमध्ये सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), गृहरक्षक आणि नागरी संरक्षण (स्वतंत्र प्रभार), पंचायती राज आणि ग्रामीण विकास विभाग होता.