जयपूर : राजस्थानमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी २०० पैकी १९९ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या काही दशकांमध्ये परंपरेने प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राज्यातील सरकार बदलते. आज सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य ५ कोटी २५ लाख ३८ हजार १०५ मतदार ठरवणार आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत (ईव्हीएम) बंद होणार आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपनेही सत्ता परिवर्तनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटले की, राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. माझी सर्व मतदारांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा. या निमित्ताने राज्यातील सर्व तरुण मित्र जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
दरम्यान, मतदानासाठी सुरक्षा दलांनी कंबर कसली असून १.७० लाखांपेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.पोलिस महासंचालक राजीव शर्मा यांनी सांगितले की, १८ राज्यांमधून सशस्त्र दलांची कुमक मतदानासाठी तैनात करण्यात आली आहे. ५२ हजार १३९ मतदान केंद्र आहेत. सर्व केंद्रांवर पोलिस व होमगार्ड तैनात आहेत. शेजारी राज्यांच्या सीमांवर २७६ तपासणी नाके उभारले असून सर्व वाहनांची कसून तपासणी होत आहे.