Mathura Lord Krishna Temple: रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. ‘अयोध्या तो झांकी हैं, काशी मथुरा बाकी हैं’, असा नारा भाजपाकडून देण्यात येतो. अयोध्येत राम मंदिराचा संकल्प झाल्यानंतर आता काशी आणि मथुरावर लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते, असा कयास आहे. यातच राजस्थानमधील एका भाजपा मंत्र्यांनी मोठी शपथ घेतली आहे.
राजस्थानच्या नवनिर्वाचित सरकारमधील शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी ही शपथ घेतली आहे. अयोध्येत राम मंदिर साकारल्यानंतर मदन दिलावर यांनी कारसेवेतील आठवणींना उजाळा दिला. राजस्थानचे कॅबिनेट मंत्री डॉ. किरोरीलाल मीणा यांच्यासह शेकडो कारसेवकांसह १९९२ मध्ये अयोध्येत बेकायदेशीरपणे सहकाऱ्यांना ताब्यात घेणे आणि खोट्या आरोपांत गोवण्याविरोधात निदर्शने केली होती. सहा वेळा आमदार आणि तीन वेळा मंत्री राहिलेल्या दिलावर यांनीही फेब्रुवारी १९९० मध्ये अयोध्येत राम मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत हार घालून घेणार नाही, अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी पाळली.
मथुरेत श्रीकृष्णाचे भव्य मंदिर होत नाही, तोपर्यंत उपवास करणार
अयोध्येतील राम मंदिरातील सोहळा संपल्यानंतर दिलावर यांच्या समर्थकांनी ३४ किलो वजन आणि १०८ फूट लांबीचा पुष्पहार आणला होता. मात्र, दिलावर यांनी तो स्वीकारला नाही. ३१ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात गेल्यावरच हार स्वीकारेन, असे दिलावर यांनी स्पष्ट केले. तसेच जोपर्यंत भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत उपवास करणार. दिवसातून एकदाच जेवणार, असा नवा संकल्प दिलावर यांनी घेतला आहे.
दरम्यान, फेब्रुवारी १९९० मध्ये दिलवार यांनी जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द होईपर्यंत बेडवर झोपणार नाही, अशी शपथ घेतली होती. तेव्हापासून ते चटईवर झोपत होते. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर दिलावर यांनी शपथ पूर्ण केली आणि बेडवर झोपू लागले.