राजस्थानचे मंत्री राजेंद्र गुडा यांनी आज विधानसभेत महिलांवरील अत्याचारावर आपल्याच सरकारला घेरले होते. यावरून गुडा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुडा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केली आहे.
गुडा यांनी मणिपूरमध्ये महिलांवर होणारे अत्याचार प्रकरणांची तुलना राजस्थानशी केली. राजस्थानमध्ये महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, हे खरे आहे. सरकारने मणिपूरमध्ये लक्ष देण्यापेक्षा राजस्थानमधील अत्याचारांवर लक्ष द्यायला हवे, असे म्हटले होते. यावरून राजस्थान सरकारवर टीका होऊ लागली होती.
गुढा यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना पत्र पाठवून राजेंद्र गुडा यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी गेहलोत यांची शिफारस मान्य केली आणि गुढा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
राजेंद्र गुडा यांच्याकडे सैनिक कल्याण (स्वतंत्र प्रभार), होमगार्ड आणि नागरी संरक्षण, पंचायत राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद होते. मणिपूरमधील महिलांची नग्न परेड केल्याच्या विरोधात काँग्रेस आमदारांनी फलक घेऊन सभागृहात निषेध व्यक्त केला. यानंतर किमान उत्पन्न हमी विधेयकावर आपले म्हणणे मांडताना राजेंद्र गुडा यांनी विधानसभेत आपल्याच सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते.