Rajasthan Politics: आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी देशातील काही राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसल्या. यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या असून, चर्चांना उधाण आले आहे.
माजी मुख्यमंत्री असलेल्या वसुंधरा राजे परिवर्तन यात्रा, विधानसभा निवडणुकांतील अन्य कार्यक्रमात किंवा भाजपच्या प्रचारात सक्रीय नाहीत. भाजपच्या विविध कार्यक्रमातही वसुंधरा राजे उपस्थित राहत नसल्याचे सांगितले जाते. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, येत्या काही दिवसांत तेथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. असे असले तरी भाजपचा लोकप्रिय चेहरा, दोन वेळा मुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा वसुंधरा राजे सक्रीय दिसत नाही. याबाबत राजस्थान भाजपने मौन बाळगल्याचे दिसत आहे. भाजपने वसुंधरा राजेंना निवडणुकीपासून दूर ठेवले आहे की वसुंधरा राजे स्वतः निवडणुकीपासून दूर राहिल्या आहेत, यावरून चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
वसुंधरा राजे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या तसेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे एका कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले होते. अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे यांची ही भेट राजस्थानच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या उद्घाटनानिमित्त झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी, राजेंद्र राठोड यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी झालेले अशोक गहलोत आणि वसुंधरा राजे यांचे एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपचे टेन्शन वाढले असून, तर्क-वितर्कांना उत आल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये आमने-सामने लढत आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत एक टक्का मतांचा फरक खेळ बिघडवू शकतो, असे म्हटले जात आहे. वसुंधरा राजे या एकमेव भाजप नेत्या आहेत, ज्यांचा राजस्थानातील सर्व जाती आणि सर्व भागात प्रभाव आहे. त्यामुळे वसुंधरा राजे यांची नेमकी भूमिका काय, विधानसभा निवडणुकीत काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.