Rajasthan CM Race: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्ये काबीज केली. पण, तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे पक्षश्रेष्ठींवर दबाव आणत आहेत. यासाठी त्यांनी शक्तीप्रदर्शनही केले. मागील तीन दिवसांत त्या सातत्याने आपल्या समर्थक आमदारांना भेटत आहेत.
भाजप यावेळी राज्यात नव्या चेहऱ्याला संधी देऊ शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे वसुंधरा राजे पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच मिळालेल्या माहितीनुसार, भाजप हायकमांड आणि वसुंधरा राजे यांच्यात फोनवर चर्चा झाली असून, वसुंधरा यांनी पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज रात्री किंवा उद्या वसुंधरा राजे दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा करणार आहेत.
वसुंधरा राजे गटाचे म्हणणे आहे की, भाजपने वसुंधरा यांच्या नावाची घोषणा करावी. दावा केला जातोय की, 40 हून अधिक आमदारांनी वसुंधरा राजे यांची भेट घेतली असून, त्यांनाच आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आमदारांच्या भेटीगाठी घेऊन वसुंधरा राजे आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पक्ष नेमका काय निर्णय घेणार, हे येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, बुधवारी (6 डिसेंबर) राजस्थानच्या राजसमंदच्या खासदार दिया कुमारी, जयपूरचे खासदार राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यसभा सदस्य किरोरी लाल मीणा यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.