Rajasthan Crime : राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध दाम्पत्याने घराच्या पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केल्याची हादरवणारी घटना घडली आहे. आत्महत्येआधी दाम्पत्याने भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवली होती ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलांवर गंभीर आरोप केले होते. चिठ्ठीनुसार, मुलांना दाम्पत्याची मालमत्ता हडप करायची होती. तसेच या जोडप्याच्या मुलांनी आणि त्यांच्या सुनांनी त्यांना पाचवेळा मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचे जेवण देखील बंद केले होते. या सगळ्या प्रकारानंतर वृद्ध पती पत्नीने आपलं आयुष्य संपवलं.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात संपत्तीसाठी आणि जमीन हडप करण्यासाठी दोन मुले, दोन मुली आणि दोन सुनांनी वृद्ध आई-वडिलांना इतका त्रास दिला की त्यांनी आत्महत्येचा पर्याय स्विकारला. आरोपी मुले त्यांना मारहाण आणि अत्याचार करत राहिले. अनेक दिवसांपासून सततच्या छळाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केली. गुरुवारी, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणातील पाण्याच्या टाकीत या वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी ७० वर्षीय हजारीराम बिश्नोई आणि ६८ वर्षीय चाळी देवी यांचे मृतदेह टाकीतून बाहेर काढून रुग्णालयात नेले.
ही हादरवणारी घटना नागौर शहरातील करणी कॉलनीत घडली. मंगळवारी रात्री बिश्नोई दाम्पत्य घरातून अचानक बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना ते घरी न दिसल्याने पोलिसांना याची माहिती दिली. शोध घेतल्यानंतर दोन दिवसांनी या जोडप्याचा मृतदेह घराच्या पाण्याच्या टाकीत सापडला. पोलिसांनी या जोडप्याच्या घराची झडती घेतली असता त्यांना एक सुसाइड नोट सापडली, जी वाचून त्यांच्याही डोळ्यात पाणी आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सेवानिवृत्त सैनिक हजारीलाल बिश्नोई पत्नी चावली देवी यांच्यासोबत करणी कॉलनीतील एका घरात राहत होते. जमिनीच्या वादामुळे त्यांची दोन्ही मुले त्यांच्यापासून विभक्त झाली. दोन्ही मुलांची घरे थोड्या अंतरावर आहेत. मोठा मुलगा राजेंद्र बीएसएफमध्ये आहे, तर लहान मुलगा सुनील गुजरातच्या अहमदाबादमध्ये खासगी नोकरी करतो. पोलिसांनी घराच्या भिंतीवर दोन पानी सुसाईड नोट चिकटवलेली दिसली. या सुसाईड नोटमध्ये दोन्ही मुलगे, दोन्ही मुली, सुना, नातवंडे काही नातेवाईकांनाही आत्महत्येसाठी जबाबदार धरण्यात आले आहे. याच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
घरातील मुलांनी दाम्पत्याला जेवण देण्यास नकार दिला आणि दररोज फोनवर शिवीगाळ केल्याचे चिठ्ठीत म्हटले होते. मुलगा सुनीलने मला फोन केला आणि म्हणाला, एक वाटी घे, खायला माग. मी तुला अन्न देणार नाही. तू कोणाला सांगितलेस तर मी तुला मारून टाकीन.” असेही या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. मुलांनी यापूर्वीच आम्हाला फसवून आणि भांडण करून तीन जागा आणि एका कारची मालकी मिळवली होती. राजेंद्र, मंजू आणि सुनीता यांच्या नावे कार ट्रान्सफर करण्यात आली. सुनील आणि त्याची पत्नी अनिता यांनाही करणी कॉलनीत घर बदलून मिळाले आहे, असेही या चिठ्ठीत म्हटलं आहे.