मतांसाठी काय पण! लोकांचे बुट पॉलिशे ते टॉयलेट सफाई; आमदाराचा व्हिडिओ व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 02:46 PM2023-10-04T14:46:11+5:302023-10-04T14:48:03+5:30
मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते काहीही करायला तयार होतात.
Rajasthan Election 2023: या वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. काही जण विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहेत, तर काही लोकांची कामे करत आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या दौसा येथून समोर आली आहे.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी येथील एका आमदाराने बुट पॉलिश करण्यापासून स्वच्छतागृह साफ करण्यापर्यंतची कामे केली. महवा विधानसभेचे अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला, यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हुडला मंगळवारी शासकीय रुग्णालयात पोहोचले आणि तेथील अस्वच्छ स्वच्छतागृह पाहिल्यानंतर त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. यानंतर स्वतः हातात झाडू आणि ब्रश घेऊन साफ सफाई करायला सुरुवात केली.
यानंतर ते हॉस्पिटलपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या भाजी मंडईत पोहोचले. यावेळी त्यांनी गाड्यावर बसून भाजी विकली. यावेळी आमदाराकडून भाजी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली. विशेष म्हणजे, एक दिवस आधी(सोमवारी) हुडला यांनी पोलिस ठाण्याबाहेर रस्त्यावर बसून लोकांच्या चपला-बुटांची पॉलिश केली होती. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.