बारमेर – राजस्थानात निवडणुकीच्या वातावरणानं जोर धरलाय. आमदार, मंत्री उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्ली आणि जयपूरच्या फेऱ्या मारत आहेत. त्यात दुसरीकडे मारवाडी समाजाचे शेतकरी नेते आणि गहलोत सरकारमधील कॅबिनेट मंत्री हेमाराम चौधरी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. चौधरी यांच्या निर्णयाने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत हेमाराम चौधरी यांना निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी गळ घातली.
समर्थकांच्या या गर्दीत अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. काहींनी तर त्यांची पगडी काढून हेमाराम यांच्या पायी ठेवली. परंतु हेमाराम चौधरी यांनी निवडणूक न लढण्याचा आग्रह कायम ठेवला. जनतेची कामे मी करु शकलो नाही त्यामुळे मला निवडणूक लढवायची नाही असं त्यांनी म्हटलं. हेमाराम चौधरी हे सचिन पायलट गटातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. हेमाराम चौधरींच्या समर्थकांनी म्हटलं की, आजच्या काळात असे खूप कमी नेते राहिलेत जे प्रामाणिकपणे काम करतात. १ रुपयांचाही भ्रष्टाचार अथवा आरोप हेमाराम चौधरी यांच्यावर झाला नाही. जनतेच्या कामासाठी चौधरी हे मध्यरात्रीही हजर राहतात. असे नेते आपल्या विधानसभेत पुन्हा होणार नाहीत. त्यासाठी आम्ही चौधरी यांनी निवडणूक लढवावी याची मागणी करत आहोत.
तर माझ्या मतदारसंघात असे बरेच प्रकल्प आहेत जे आमचे सरकार असताना करू शकलो नाही. पाण्यापासून अन्य योजना माझ्या मतदारसंघात सुरू झाल्या नाहीत. मग मी पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहणे हे जनतेसोबत विश्वासघात केल्यासारखे आहे. ते मला करायचे नाही. मागील ४५ वर्ष मतदारसंघातील जनतेने मला आशीर्वाद आणि प्रेम दिले. त्याच बळावर मी आमदार, मंत्री आणि विरोधी पक्षनेताही बनलो असं हेमाराम चौधरी यांनी सांगितले. त्याचसोबत आता नवीन लोकांना पुढे येण्याची संधी मिळावी असं मी जनतेला समजावत आहे. माझ्या निवृत्तीचे वयदेखील झाले आहे. परंतु जनता ऐकण्यास तयार नाही. मी पक्षाकडे तिकीट मिळावे यासाठी अर्जही केला नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यमागे पूर्ण ताकदीने आम्ही उभे राहू असंही ते म्हणाले.
कोण आहेत हेमाराम चौधरी?
हेमाराम चौधरी यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात आतापर्यंत ८ निवडणुका लढवल्या आहेत. त्यातील केवळ २ निवडणूक ते हरलेत. इतर ६ निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने हेमाराम निवडून आलेत. आधी गहलोत सरकारमध्ये राज्यमंत्री, वसुंधरा सरकारमध्ये विरोधी पक्षनेता आणि सध्याच्या गहलोत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. हेमाराम चौधरी यांनी २०१३ मध्येही निवडणूक लढण्यास नकार दिला होता. परंतु राहुल गांधी यांनी केलेल्या फोनच्या आग्रहामुळे ते निवडणुकीस उभे राहिले. परंतु ती निवडणूक ते हरले. २०१८ मध्ये सचिन पायलट यांच्या सांगण्यावरून हेमाराम चौधरी यांनी निवडणूक लढली होती. २०२० मध्ये सचिन पायलट यांनी बंडखोरी केली तेव्हा हेमाराम चौधरी त्यांच्यासोबत होते.