राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार असून भाजप ५ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने आता निवडणुकीची तयारी केली आहे.
भाजपकडून गुरुवारी राजस्थानमध्ये निवडणूक व्यवस्थापन समिती आणि संकल्प पत्र समितीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना दोन्ही समितीत स्थान देण्यात आलेले नाही.
नवी दिल्ली येथे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. यावेळी भाजपने समितीची ही यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या राज्य संकल्प पत्र समितीमध्ये एका केंद्रीय मंत्र्याला स्थान देण्यात आले असून, दोन खासदारांचाही समावेश आहे. तर २५ सदस्यीय संकल्प पत्र समितीमध्ये वसुंधरा राजे यांचे नाव नाही.
संकल्प पत्र समितीशिवाय भाजपच्या राजस्थान युनिटने 'राज्य निवडणूक व्यवस्थापन समिती'ही जाहीर केली आहेय विशेष म्हणजे या समितीतही वसुंधरा राजे यांचे नाव नाही. या २१ सदस्यीय निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नारायण पंचारिया यांना निमंत्रक करण्यात आले आहे.
याचबरोबर, ६ जणांना सहसंयोजक करण्यात आले आहे. यामध्ये ओंकार सिंह लखावत, राज्यवर्धन सिंह राठौर, भजनलाल शर्मा, दामोदर अग्रवाल, सीएम मीना आणि कन्हैयालाल बैरवाल यांना संयुक्त समन्वयक बनवण्यात आले आहे.