Rajasthan Exit Poll: राजस्थानात काँग्रेस ट्रेंड बदलणार की भाजपा शतक ठोकणार? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:39 PM2023-11-30T17:39:20+5:302023-11-30T18:37:08+5:30
विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे
जयपूर - राजस्थानात २५ नोव्हेंबरला १९९ जागांसाठी मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ७५.४५ टक्के होती. राजस्थानच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याचा निर्णय ३ डिसेंबरला लागणार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. २०१३ मध्ये भाजपाला १६३ जागा मिळाल्या होत्या तर २०१८ च्या निवडणुकीत भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला चांगली बढत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सत्ताधारी काँग्रेसनंही कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळत आहे.
या एक्झिट पोलमध्ये राजस्थानच्या एकूण १९९ मतदारसंघात ३८ हजार ६५६ लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हडौती विभागात भाजपाला ११ तर काँग्रेसला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.अहिरवाल विभागात भाजपाला ९ जागा तर काँग्रेस १० जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. शेखावटी भागात भाजपाला ७, काँग्रेसला १२ तर इतर २ जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. मेवाड-गोडवाड भागात काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत आहे. एकूण मतदानानुसार, भाजपाला ४१ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इंडिया टुडे एक्झिट पोलनुसार राजस्थानचा अंदाज काय सांगतो?
भाजपा - ८०-१००
काँग्रेस -८०-१०६
इतर - ९-१८
जन की बात एक्झिट पोलमधील अंदाज
भाजपा - १००-१२२
काँग्रेस ६२-८५
इतर - १४-१५
TV9 पोलस्ट्रेटचा अंदाज
भाजपा - १००-११०
काँग्रेस - ९०-१००
इतर - ०-१५
निवडणुकीत 'हे' मुद्दे ठरले निर्णायक
हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून कन्हैया लालची हत्या, हिंदू सणांवरील रॅलीत दगडफेक, स्फोटातील आरोपी मुक्त होणे, पीएफआयची रॅली, भाजपानं पेपर लीक प्रकरण, गहलोत सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक मुद्दे निवडणूक प्रचारात चर्चेत आले.
विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत (ईव्हीएम) बंद झालं असून या सर्वांचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.राजस्थानच्या राजकीय इतिहासात गेल्या अनेक दशकांचा असा ट्रेंड आहे की, या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. परंतु यंदा जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागेल.