राजस्थानात भाजपानं तिकीट नाकारलेल्या विद्यार्थी नेत्यानं दिला दिग्गजांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 11:51 AM2023-12-03T11:51:31+5:302023-12-03T11:53:35+5:30
सकाळपासून निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाल्यापासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे.
जोधपूर - राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. या निवडणुकीत भाजपानं जबरदस्त कामगिरी केली आहे. काँग्रेसच्या हातून राजस्थान, छत्तीसगड निसटण्याची चिन्हे आहेत. त्यात राजस्थानातही भाजपानं मुसंडी घेत १०० चा आकडा पार केला आहे. या निवडणुकीत शिव विधानसभा जागेवर सर्वांचे लक्ष होते. कारण इथं भाजपाशी बंडखोरी करून एका विद्यार्थी नेत्यानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
सकाळपासून निवडणुकीतील मतमोजणी सुरू झाल्यापासून या मतदारसंघात अपक्ष उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे. इथं अपक्ष उमेदवार रविंद्र सिंह भाटी मतदारसंघातील इतर दिग्गज उमेदवारांवर भारी पडताना पाहायला मिळत आहेत. सकाळी ११ च्या आकडेवारीनुसार, या मतदारसंघात काँग्रेस, भाजपा यांच्यासह अनेक उमेदवार पिछाडीवर आहे. रविंद्र सिंह भाटी हे १६ हजार ८६३ मतांनी पुढे आहेत. तर दुसऱ्या नंबरवर अपक्ष उमेदवार फतेह खान ९ हजार ३२२, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार अमीन खान यांना ६ हजार ६३४ मते पडली आहेत. तर चौथ्या नंबरवर RLP चे उमेदवार जालम सिंह यांना ३ हजार २५८ मते आणि भाजपा उमेदवार स्वरुप सिंह खारा यांना २ हजार ४४८ मते पडली असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत.
कोण आहे रविंद्र सिंह भाटी?
रविंद्र सिंह भाटी यांचं नेतृत्व विद्यार्थी चळवळीतून पुढे आले आहे. ते जोधपूर विद्यापीठात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. या निवडणुकीपूर्वी रविंद सिंह भाटी यांनी भाजपात प्रवेश केला होता. परंतु निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने भाटी हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरले. आतापर्यंतच्या कलामध्ये शिव विधानसभा जागेवर भाजपाची मते रविंद सिंह भाटी यांच्याकडे वळताना दिसतायेत. तर मुस्लीम मते अमीन खान आणि फतेह खान यांच्यात विभागली गेली आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!