अजमेर : राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात एका हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी एका IAS आणि IPS अधिकाऱ्यासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. अजमेर विकास प्राधिकरणाचे आयुक्त गिरीधर, विशेष कर्तव्य अधिकारी (गंगापूर शहर पोलीस) सुशील कुमार बिश्नोई, पटवारी नरेंद्र सिंह दहिया, कॉन्स्टेबल मुकेश कुमार आणि एलडीसी हनुमान प्रसाद चौधरी अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा तपास एडीजी व्हिजिलन्स यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सोशल मीडियावर या घटनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यामध्ये काही लोक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. ही घटना 11 जूनच्या रात्री घडली, या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला. हॉटेल व्यवस्थापनाने आपल्या तक्रारीत आरोप केला की, सोमवारी रात्री उशिरा तीन-चार पोलिसांसह एका आयपीएस अधिकाऱ्याने हॉटेलच्या कर्मचार्यांना मारहाण केली.
मारहाणीचे कारण काय?रिपोर्टनुसार, आयपीएस अधिकाऱ्याला नवीन पोस्टिंग मिळाली होती, म्हणून सर्वांनी पार्टी केली. यानंतर त्यांना वॉशरुम वापरायचे होते, पण त्या हॉटेलवाल्याने दरवाजे उघडले नाहीत, म्हणूनच मारहाणीला केली. दुसऱ्या एका रिपोर्टनुसार, आयपीएस अधिकाऱ्याने विनाकारण हॉटेलमधील कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्यामुळे वाद झाला.
या घटनेनंतर राजपूत समुदायाने मंगळवारी राजस्थान पर्यटन विकास महामंडळाचे (आरटीडीसी) अध्यक्ष धर्मेंद्र राठोड यांना निवेदन सादर केले आणि याप्रकरणी पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणातील आरोपी ओएसडी बिश्नोई यांनी आरोपांचे खंडन केले. आता याप्रकरणी तपास झाल्यानंतर सत्य समोर येईल.