राजस्थानच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेहलोत सरकारचे विधानसभेत वाभाडे काढणारे मंत्री राजेंद्र सिंह गुढ़ा यांची हकालपट्टी केली आहे. याचबरोबर काँग्रेसच्या आमदारांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप गुढा यांनी केला आहे. एवढे सगळे घडण्यामागे एक लाल रंगाची डायरी कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.
एकेकाळचे एकमेकांचे अत्यंत जवळचे असलेले अशोक गेहलोत आणि गुढा यांच्यात एवढे वितुष्ट का आले? आज सकाळी गुढा हे विधानसभेत जात होते, तेव्हा त्यांना अडविण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. यानंतर ते प्रसारमाध्यमांसमोर रडत होते. गुढा यांना ५० लोकांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस नेत्यांनी मला विधानसभेतून बाहेर फेकल्याचे गुढा म्हणाले. मी भाजपासोबत असल्याचाही आरोप केला, असे ते म्हणाले.
बसपाच्या तिकिटावर आमदार झालेले गुढा आणि गेहलोत यांच्यात एवढे काय बिनसले आहे, त्याला अनेक राजकीय पैलू आहेत. आवडीचा विभाग न मिळाल्याने गुढा गेहलोत यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी गेहलोत-पायलट वादात सचिन पायलट यांची बाजू घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे दोघांमध्ये अंतर वाढत गेले.
सोमवारी शून्य प्रहरावेळी गुढा हे 'लाल डायरी' घेऊन अध्यक्ष सीपी जोशी यांच्या आसनाजवळ पोहोचले होते. त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केला. सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गुढांनी लाल डायरी हलवताच अध्यक्षांनी त्याला त्यांच्या चेंबरमध्ये येण्यास सांगितले. काही वेळाने गुढा संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्याकडे पोहोचले आणि त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली.
भाजप आमदारांनीही 'रेड डायरी'च्या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ घातला आणि सभागृहाच्या वेलमध्ये पोहोचले. आज विधानसभेत लाल डायरीबद्दल खुलासा करणार आहे असे गुढा यांनी पत्रकारांना सांगितले होते. आता त्यावरून राजस्थानमध्ये काय खुलासे होतात, ते राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. या डायरीमध्ये भ्रष्टाचाराच्या नोंदी असल्याचे सांगितले जात आहे.