Sachin Pilot PC: पायलट-गेहलोत वाद चव्हाट्यावर; सरकारविरोधात 'जन संघर्ष पदयात्रा', 11 मे रोजी सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:59 PM2023-05-09T13:59:00+5:302023-05-09T14:00:45+5:30
Sachin Pilot Press Conference: काँग्रेस नेते सचिन पायलट अशोक गेहलोत सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत.
Jan Sangharsh Pad Yatra:राजस्थानमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पायलट आणि गेहलोत यांच्यात सुरू असलेला कहल आज पुन्हा चव्हाट्यावर आला. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर उघडपणे निशाणा साधला. तसेच, पायलट यांनी पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली. राजस्थान निवडणुकीपूर्वी सचिन पायलट अजमेर येथून सरकारविरोधात 'जनसंघर्ष पद यात्रा' करणार आहेत. हा प्रवास 125 किलोमीटरचा असेल, ज्यामध्ये सचिन पायलट जनतेमध्ये जाऊन त्यांच्या तक्रारी ऐकतील.
सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराबाबत ते जेव्हाही बोलतात तेव्हा त्यांना गेहलोत सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे त्यांनी आता 11 मे रोजी अजमेर येथून पदयात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ती पाच दिवस चालणार आहे. यादरम्यान सचिन पायलट जनतेमध्ये जाऊन त्यांचे म्हणणे ऐकणार आहे.
#WATCH | For the first time, I am seeing someone criticize MPs and MLAs of their own party. Praising leaders from BJP and dishonouring Congress leaders is beyond my understanding, this is absolutely wrong: Congress MLA Sachin Pilot pic.twitter.com/wqlCNwykqC
— ANI (@ANI) May 9, 2023
अजमेर का ?
सचिन पायलट सांगतात की, राजस्थानमध्ये पेपरफुटीचा मुद्दा त्यांनी अनेकदा उपस्थित केला आहे, पण कोणतीही कारवाई झाली नाही. RPSC चे कार्यालय अजमेर येथे आहे, त्यामुळेच ते स्वतः तिथे जाऊन भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढणार आहेत. ही पदयात्रा 125 किलोमीटर लांबीची असून पाच दिवस चालणार आहे. जनतेचा दबाव असेल तेव्हाच सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे सचिन पायलट म्हणाले. त्यामुळेच ते सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेतील आणि त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील.
वसुंधरा राजे, गेहलोत यांच्या नेत्या
ते पुढे म्हणाले, अशोक गेहलोत यांचे शेवटचे भाषण मी ऐकले. हे भाषण ऐकल्यानंतर मला असे वाटते की, त्यांच्या (अशोक गेहलोत) नेत्या सोनिया गांधी नसून त्यांच्या नेत्या वसुंधरा राजे सिंधिया आहेत. अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत सचिन पायलट म्हणाले, एकीकडे आमचे सरकार पाडण्याचे काम भाजप करत असल्याचे ते बोलतात आणि दुसरीकडे वसुंधरा राजेंमुळे आमचे सरकार वाचले, असे ते म्हणत आहेत. या विधानात बराच विरोधाभास आहे. हे स्पष्ट केले पाहिजे असे मला वाटते.