Satyapal Malik: काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोठे गौप्यस्फोट केले. तसेच यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले. मात्र, आता पुन्हा एकदा सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात भाष्य केले आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास केला असता तर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे.
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, २०१९ ची लोकसभा निवडणूक आमच्या सैनिकांच्या मृतदेहांवर लढली गेली. कोणतीही चौकशी झाली नाही. चौकशी झाली असती तर तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता. अनेक अधिकारी तुरुंगात गेले असते आणि मोठा वाद निर्माण झाला असता. संबंधितांचा तपास करण्यात आला नाही, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.
तीन वर्षांत तुमची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा
उद्योगपती आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासंदर्भात बोलताना सत्यपाल मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. त्याच्यासोबतचे लोक म्हणजे अदानी, ज्यांनी तीन वर्षात इतकी संपत्ती जमा केली की ते देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तीन वर्षांत तुमच्यापैकी कुणाची संपत्ती एवढी वाढली असेल तर मला सांगा, असा खोचक सवाल सत्यपाल मलिक यांनी केला. संसदेत राहुल गांधींनी अदानीकडे २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल केला होता. परंतु, पंतप्रधानांना त्याचे उत्तर देता आले नाही, अशी टीका सत्यपाल मलिक यांनी केली.
दरम्यान, गोव्याचा राज्यपाल असताना मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंतप्रधानांकडे केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, मलाच हटवण्यात आले. त्यांना हटवले नाही. म्हणूनच मला खात्री आहे की, ते भ्रष्टाचार करतात. त्यात त्यांचा वाटा आहे. त्याची संपूर्ण रक्कम अदानीकडे जाते, असा मोठा आरोप सत्यपाल मलिकांनी केला. तसेच या सरकारला जनताच हटवू शकते, माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही ही वेळ चुकवली तर यानंतर पुन्हा संधी मिळणार नाही, असे आवाहन सत्यपाल मलिक यांनी केले.