राजस्थानचा निकाल ठरवणार देशाच्या राजकारणाचा मूड; लोकसभेच्या निवडणुकीतील मुद्दे होतील तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 08:10 AM2023-10-12T08:10:20+5:302023-10-12T08:11:08+5:30
...परंतु लोकसभेच्या फायनलमध्ये देशाचा मूड कसा असेल हे मुख्यतः राजस्थानच्या निकालावर अवलंबून असेल.
सुनील चावके -
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपची पीछेहाट होणार, अशी भाकिते निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्ये वर्तविली जात आहेत. परंतु लोकसभेच्या फायनलमध्ये देशाचा मूड कसा असेल हे मुख्यतः राजस्थानच्या निकालावर अवलंबून असेल.
राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्षाला पाच वर्षांची अँटी-इन्कम्बन्सी विरुद्ध केंद्रातील सरकारची दहा वर्षांची कामगिरी यावर निवडणूक होईल. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी गेहलोत यांचे नाव चर्चेत येताच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यासाठी सचिन पायलट यांनी मोर्चेबांधणी केली, पण त्यांच्यातील शमलेला सत्तासंघर्ष काँग्रेस पक्ष लढतीत असल्याचा आभास निर्माण झाला आहे.
भाजपचा भर मोदी करिष्म्यावर
दुसरीकडे राजस्थानमध्ये हमखास यश मिळवून देणाऱ्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्याऐवजी भाजप श्रेष्ठींनी सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे. भाजपने २५ पैकी नऊ खासदारांना मैदानात उतरविले आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच करिष्म्यावर भाजपने भर दिला आहे. विधानसभा निवडणुकांतील भाजपच्या या रणनीतीची सर्वात मोठी कसोटी राजस्थानमध्ये लागणार आहे.
‘इंडिया’च्या यशाची शाश्वती नाही
राजस्थानात दर पाच वर्षांनी अपरिहार्यपणे होणारा सत्ताबदल, सरकारविरोधी रोष आणि पक्षांतर्गत लाथाळ्यांवर मात करीत काँग्रेसला लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळविणे जवळपास अशक्य मानले जात आहे. काँग्रेसने मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि अगदी मिझोराममध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, तरी लोकसभा निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीच्या यशाची शाश्वती देता येणार नाही, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.