राजस्थानमध्ये सध्या लाल डायरीची खूप चर्चा सुरु झाली आहे. गेहलोत यांनी हकालपट्टी केलेले मंत्री राजेंद्र गुढ़ा यांनी आज विधानसभेत लाल डायरी आणली होती. त्याचा खुलासा आता गुढा यांनी केला आहे. यावरून गुढा यांना विधानसभा अध्यक्षांनी मार्शलची मदत घेऊन विधानसभेबाहेर काढले होते. यावेळी आपल्याला काँग्रेस आमदार आणि ५० लोकांनी मारहाण केल्याचा आरोप गुढा यांनी केला होता.
राजस्थानमध्ये येत्या काही महिन्यांत निवडणुका आहेत. त्यापूर्वीच्या या वादळामुळे राजस्थानात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. सोमवारी विधानसभेत पोहोचले तेव्हा त्यांना विधानसभेत येऊ दिले नाही, मात्र जेव्हा ते सभागृहात पोहोचले आणि अध्यक्षांसमोर लाल डायरी फिरवू लागले तेव्हा अध्यक्ष सीपी जोशी संतापले होते. ही तीच लाल डायरी आहे, ज्यामध्ये आमदारांच्या घोडे-व्यवहाराचा संपूर्ण लेखाजोखा आहे, असे गुढा यांनी विधानसभेत ओरडून सांगितले.
गुढा यांनी सभागृहातून बाहेर पडून माझ्याकडून लाल डायरी हिसकावण्यात आल्याचे सांगितले, त्यात अनेक काळ्या गोष्टी असल्याचा दावा गुढा यांनी केला. सीएम अशोक गेहलोत यांच्या जवळचे धर्मेंद्र राठोड यांच्या घरावर छापा टाकला जात होता, तेव्हा मी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राठोड यांच्या घरातून डायरी बाहेर काढली होती. ती डायरी जर बाहेर काढली नसती तर आज गेहलोत तुरुंगात गेले असते. गेहलोत यांनी मला ती डायरी जाळायला सांगितलेली, असा आरोप गुढा यांनी केला आहे.
आमदारांना आपल्या बाजुने ठेवण्यासाठी काय दिले गेले होते, याचा संपूर्ण लेखाजोखा या डायरीत असल्याचा दावा गुढा यांनी केला. राजेंद्र गुढा यांनी आजतकला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. मला विधानसभेत बोलण्याची संधी द्या, अशी विनंती मी अध्यक्षांना केली होती. अध्यक्षांनी माझे ऐकले नाही, तसेच बाहेर बाहेर काढण्यात आले. आमदारांनी माझ्याकडून जबरदस्तीने डायरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गुढा यांनी केला आहे.
सुशिक्षित मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो आहे. माझ्या मतदारसंघात गुन्हेगारी वाढली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा मला गप्प केले गेले, असा आरोप गुढा यांनी केला आहे.