सध्या पावसाळा सुरू असल्याने देशभरातील अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर, धरणे, बंधारे भरुन वाहून लागले आहेत. गावखेड्यातील तलावांतूनही पाणी वाहताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडतोय. मात्र, या पावसात जनजीवन विस्कळीत झाल्याचंही काही ठिकाणी पाहायला मिळालं. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून मदत करण्याचा प्रयत्नही केला जातोय. राजस्थानमध्ये अशाच एका प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे, दोघांचा जीव वाचला.
उदयपूरच्या मोरवानिया पुलावरुन जात असताना दोन युवकांना पाण्याचा अंदाजच आला नाही. त्यामुळे पुलावरुन वाहत्या पाण्यात त्यांनी दुचाकी घातली. पाण्याचा प्रवाह मोठा आणि गतीमान असल्याने दोघांची गाडी पुलाच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने या दोघांनी पुलाच्या कठड्याला हाताने घट्ट पकडत स्वत:ला सावरले. त्यानंतर, मदतीसाठी याचना केली. पुलाजवळ अडकलेल्या इतर प्रवाशांनी तात्काळ प्रशासनाला संपर्क केला. त्यावेळी, हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने संबधित अधिकाऱ्यांनी या दोन तरुणांना वाहत्या पाण्यातून बाहेर काढले. त्यामुळे, त्यांचा जीव भांड्यात पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नशिब बलवत्तर म्हणूनच दुचाकीस्वार दोघेही बचावले.
दरम्यान, सध्या पावसाचा जोर वाढला असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे, पुलावरुन जाताना प्रवाशांनी काळजी घ्यायला हवी. प्रशासनाकडून तसे आवाहनही करण्यात येत आहे. तसेच, पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना, पर्यटकांनाही प्रशासनाने पाण्याच्या प्रवाहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सेल्फी आणि फोटोशूटच्या नादात आपल्या जीवाशी खेळ करू नये, असेही सांगण्यात येते. तर, सोशल मीडियावर अशा अनेक दुर्घटनेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे, प्रवाशांना या व्हिडिओतून किंवा घडलेल्या दुर्घटनेतून बोध घ्यायला हवा. पाण्यातून गाडी चालवताना विचार करायला हवा.