जयपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ‘लाल डायरी’च्या मुद्द्यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. या मुद्द्यावर गेहलोत यांनी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे ते म्हणाले.
राजस्थानमधील गंगापूर शहरात सहकार किसान मेळाव्याला संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले, “आजकाल गेहलोत साहेब लाल डायरीला खूपच घाबरतात. का बरं घाबरत असतील... राजस्थानच्या लोकांनो तुम्हीच सांगा?... डायरीचा वरचा भाग लाल असला तरी आत काळे कारनामे दडलेले आहेत.
कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा त्या डायरीत आहे. मी गेहलोत यांना हे सांगायला येथे आलो आहे की, थोडीशी चाड उरली असेल तर लाल डायरीच्या मुद्द्यावर राजीनामा द्या आणि निवडणुकीच्या मैदानात या… दोन हात करा.’’ (वृत्तसंस्था)
भाजपने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केलेयापूर्वीच्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही, तर भाजपने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले. अनेक योजना सुरू केल्या, असा दावा शाह यांनी केला. ‘‘काँग्रेस सरकार सत्तेवर असताना कृषी बजेट २२ हजार कोटी रुपयांचे होते, जे मोदीजींनी सहा पटीने वाढवून एक लाख २५ हजार कोटी रुपये केले,’’ असे ते म्हणाले. यावेळी खासदार सुखबीरसिंग जौनपुरिया व जसकौर मीना, राज्यसभा सदस्य किरोरी लाल मीना आणि विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड उपस्थित होते.
घरात लाल रंगाची डायरी ठेवू नका... भाषणाच्या शेवटी ते तिरकसपणे म्हणाले, “घरात डायरी काेणतीही असू द्या; पण तिचा रंग लाल असू नये. नाहीतर गेहलोत यांना राग येईल. राजस्थानचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुडा यांनी २४ जुलै रोजी विधानसभेत कथित ‘लाल डायरी’चा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सभागृहात गदारोळ होऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते.’’ शाह यांच्या भाषणाच्या सुरुवातीला काही लोक घोषणाबाजी करताना दिसले. याकडे लक्ष वेधत गृहमंत्री म्हणाले, “घोषणा देणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, घोषणाबाजी करण्याऐवजी चंद्रयान पुढे ढकलले असते तर आज घोषणाबाजी करण्याची गरजच पडली नसती. सहकार मंत्रालयाची स्थापना केली असती, शेतकऱ्यांचे कल्याण झाले असते व आज घोषणाबाजी करण्याची गरज पडली नसती.’’