राजस्थानमधील बंपर विजयानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सध्या चर्चा सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानीही बैठक झाली. ज्यामध्ये भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा देखील सहभागी झाले होते. या बैठकीत मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तसेच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या नावांवरही चर्चा झाली. बैठकीदरम्यान जेपी नड्डा यांनी नरेंद्र मोदींसोबत तिन्ही राज्यांच्या नेत्यांच्या भेटीदरम्यान मिळालेली माहितीही शेअर केली. मात्र राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाला मिळणार हे अद्याप ठरलेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या वसुंधरा राजेही बुधवारी रात्री दिल्लीत पोहोचल्या आहेत. त्या आज हायकमांडलाही भेटण्याची शक्यता आहे. वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार बनवणारे असे काही फॅक्टर आहेत, ते जाणून घेऊया...
१) राजस्थानमधील भाजपचा मोठा चेहरावसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. वसुंधरा राजे राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. राजस्थान भाजपमध्ये त्यांच्या उंचीचा दुसरा नेता दिसत नाही. यावेळी राजस्थानमध्ये भाजपने पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, मुख्यमंत्री चेहरा म्हणून वसुंधरा राजे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. परंतू, आजवर वसुंधरा राजे बाजूला झाल्या नाहीत, हेही तुम्ही समजून घेतले पाहिजे. राजस्थानच्या प्रत्येक महत्त्वाच्या बैठकीला वसुंधरा राजे उपस्थित राहिल्या आहेत. वसुंधरा राजे यांच्या अनेक समर्थकांना भाजपने तिकीट दिले आणि त्या आमदारही झाल्या. त्यामुळे वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा प्रबळ आहे.
२) दोनदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीदुसरी बाब म्हणजे वसुंधरा राजे याआधी दोनदा राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. वसुंधरा राजे यांचा अनुभव सरकार चालवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. वसुंधरा राजे यांना प्रशासनाची चांगली जाण आहे. याचा फायदा भाजपलाही घ्यायचा आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे यांना राजस्थानची जनता आणि तेथील राजकारण चांगलेच माहीत आहे. अशा स्थितीत नव्या चेहऱ्याला संधी देणे जास्त धोकादायक ठरू शकते. त्यापेक्षा वसुंधरा राजे यांच्यासारख्या अनुभवी नेत्या राजस्थानची धुरा सांभाळताना इतरांपेक्षा सरस ठरू शकतात.
३) २०२४ च्या निवडणुकांवर होऊ शकतो परिणाम तिसरा फॅक्टर म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुका काही महिन्यांत होणार आहेत. त्याआधी राजस्थानमध्ये कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाचा धोका भाजपला पत्करायचा नाही. वसुंधरा राजे या राजस्थानच्या शक्तिशाली नेत्या आहेत. वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री न केल्यास त्या स्वतः आणि त्यांचे समर्थक नाराज होऊ शकतात. याचा परिणाम २०२४ च्या निवडणुकांवर होऊ शकतो. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे.
४) अनेक आमदारांचे समर्थनवसुंधरा राजे काल रात्री जयपूरहून दिल्लीत पोहोचल्या. याआधी त्यांनी राजस्थानच्या जवळपास ६० आमदारांची भेट घेतली आहे. निवडून आलेल्या भाजप आमदारांमध्ये वसुंधरा राजे यांच्या समर्थकांची संख्या चांगली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावाही बळकट झाला आहे.
५) सर्व समाजाला हाताळण्यास सक्षमभाजपचे धोरण वसुंधरा राजे यांच्याशी सुसंगत आहे, ज्या अंतर्गत जाट नसलेल्या व्यक्तीला हरयाणाचे मुख्यमंत्री बनवले गेले. म्हणजे एखाद्या राज्यात कोणत्याही जातीची संख्या जास्त असेल तर मुख्यमंत्री हा वेगळ्या जातीचा असावा. राजस्थानमध्ये राजपूत, ब्राह्मण, गुर्जर, ओबीसी, दलित, आदिवासी असे सर्व समाजाचे लोक आहेत. मात्र हे सर्व सोडून भाजप वसुंधरा राजे यांना संधी देण्याचा विचार करू शकते. यामुळे भाजप जातीय संघर्ष टाळू शकते. भाजपने वसुंधरा राजेंशी संबंधित या फॅक्टर्स किंवा घटकांचा विचार केल्यास वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री पद मिळू शकते, असे म्हटले जात आहे.