राजस्थान जिंकले तरी मुख्यमंत्री पदावरून भाजपमध्ये दोन गटांत घमासान सुरु झाले आहे. वसुंधरा राजे यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन करत दिल्ली कूच केली आहे. तर वसुंधरा राजेंच्या पुत्राने स्वमालकीच्याच रिसॉर्टमध्ये ६० हून अधिक आमदारांना जबरदस्तीने रोखले आहे, त्यामध्ये आपला मुलगाही असल्याचा आरोप माजी आमदाराने केला आहे. वसुंधरा यांनी या आमदाराचे तिकीट कापून त्याच्या मुलाला दिले होते.
वसुंधरा राजेंचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांनी आपला मुलगा ललित याला जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये रोखून ठेवल्याचा आरोप हेमराज मीणा यांनी केला आहे. मीणा यांनी आज जयपूरचे भाजपचे कार्यालय गाठले होते. दुष्यंत सिंग यांनी मंगळवारी रात्री उशिरा आमदारांना रिसॉर्टवर नेले, काही आमदार दिल्ली रोडवरील कोणत्या रिसॉर्टवर जात असल्याची चर्चा करत होते. ते आमदार ललित यांनी ऐकले आणि मला फोन करून याची माहिती दिल्याचा दावा, मीणा यांनी केला आहे. यानंतर आपण प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि महामंत्री चंद्रशेखर यांना फोन करून याची माहिती दिल्याचे मीणा यांनी सांगितले.
राजेंच्या रिसॉर्टवर मी मुलाला आणण्यासाठी गेलो असता मला रोखले गेले. दुष्यंतने फोन उचलला नाही. म्हणून जोशी आणि आमदार भजनलाल शर्मा रिसॉर्टकडे आले आणि ललितला सोबत घेऊन आले. यानंतर राजे समर्थक कंवरलाल यांच्या समर्थकांनी आमच्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप मीणा यांनी केला आहे.
यावरून अमित शाहांनी वसुंधरा राजेंना आमदारांना कोणी रोखलेय असे विचारले असता त्यांनी अशाप्रकारची घटना घडली नसल्याचे सांगितले. तर सीपी जोशी यांनी देखील हॉटेलसारख्या गोष्टीची आपल्याला काही माहिती नाहीय. ललितचे वडील मला भेटले होते हे खरे आहे, परंतू सामान्य चर्चा झाली. तसेच प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांनी देखील अशा प्रकारची गटबाजी झालेली नसल्याचे म्हटले आहे.