चिपळूण : जिल्ह्यात पावसाळ्यात ज्या नद्यांमुळे नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. त्या वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, बावनदी आणि अर्जुना नद्यांमधील गाळ उपसा पूर्णत्वाकडे गेला आहे. अलोरे यांत्रिकी विभागातर्फे यावर्षी १३ नद्यांमधून तब्बल १० लाख ९० हजार घनमीटर इतका गाळ उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीत त्याचा चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.तीन टप्प्यात गाळ उपशाचे नियोजन करताना पहिल्या टप्प्यात वाशिष्ठीत राज्यभरातील यंत्रसामुग्री लावून उपसा करण्यात आला. शिव नदीतून २ लाख २० हजार ९४० घनमीटर तर वाशिष्ठी नदीतील ५ लाख ५० हजार ५१४ घनमीटर, बहादूरशेख नाका येथील बेटावरील सुमारे ३५ हजार घनमीटर असा एकूण ८ लाख घनमीटर गाळ गतवर्षी काढला गेला. उपसलेल्या गाळामुळे नद्यांचे खोलीकरण आणि रूंदीकरण झाले आहे.यावर्षी नोव्हेंबरपासून यांत्रिकी विभाग अलोरेने जिल्ह्यातील काही प्रमुख नद्यांतील गाळ उपसाला सुरूवात केली. वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, बावनदी आणि अर्जुना या प्रमुख नद्यांना पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे बाजारपेठेतील दुकानांसह नागरिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे यावर्षी जिल्हा नियोजन समिती, जलसंपदा विभागातर्फे पूर नियंत्रण अंतर्गत नद्यातील गाळ उपशासाठी निधी मंजूर करण्यात आला. यांत्रिकी विभागाने संगमेश्वर, चिपळूण, लांजा आणि राजापूर या तालुक्यातील गाळ उपसा काम मार्गी लावले.
जिल्ह्यातील काही प्रमुख नद्यांना पावसाळ्यात नेहमीच पूर येतो. विशेषतः वाशिष्ठी, शास्त्री, काजळी, बावनदी आणि अर्जुना नदी गाळाने भरल्याने त्यांची पाण्याची वहन क्षमता कमी झाली होती. आता नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात निघाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. - जावेद काझी, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग अलोरे.