रत्नागिरी - रत्नागिरीच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 100 फूट उंच उभारण्यात आलेला ध्वज हा रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे, असे उद्गार पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी काढले आहेत. या ध्वजाचे उद्घाटन पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री वायकर म्हणाले की, गेली पाच वर्षे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्य करताना या जिल्ह्यातील नागरिकांनी व आपल्या सहकाऱ्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. अनेक विविध प्रसंगामध्ये या जिल्ह्यातील नागरिकांनी आलेल्या संकटाला धैर्याने तोंड दिले. निर्सगाचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्याचा विकास सदैव होत राहील, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रास्ताविकात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा ध्वज उभारण्याच्या कामी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच डी. के. फाऊंडेशनचे डॉ. राकेश बक्षी यांनी हा ध्वज उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उपविभागीय अधिकारी अमित शेंडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, तटरक्षक दलाचे दांडेकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश सुखटणकर हे देखील यावेळी उपस्थित होते.
20730 फूट आकाराचा हा ध्वज एनसीसी कॅडेटनी आणून पालकमंत्री वायकर व उपस्थित मान्यवरांकडे सुपुर्द केला. यानंतर हा ध्वज ध्वजस्तंभावर चढविण्यात आला आहे. यावेळी डी. के. फाऊंडेशनचे डॉ. बक्षी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप साळवी, ठेकेदार युवराज बोंद्रे, गोदुताई जांभेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गोदुताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थिनींनी झांजपथक व लेझीम नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक, तटरक्षक दल, पोलीस दल, एनसीसीचे विद्यार्थी आणि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.