दस्तुरी : चिपळुणातील पूरग्रस्त नागरिकांना आपणही आपल्यापरीने मदतीचा हात द्यावा, या हेतूने मालवण येथील १०० इडियट्स या व्हाॅट्सॲप ग्रुपचे ॲडमिन सिरस डिसुजा यांनी ग्रुप सदस्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जीवनावश्यक साहित्य जमा करण्यात आले. या साहित्याचे चिपळूण येथे वाटप करण्यात आले.
या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रुप सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. अनेक हात एकत्र आल्याने एका दिवसात लाखांचा टप्पा पार झाला. जीवनावश्यक साहित्यासह जमा झालेले पैसे एकत्रित करून जीवनावश्यक साहित्य व कपडे खरेदी करून चिपळूण येथे प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून ज्याठिकाणी अतिशय तातडीची गरज आहे, अशा भागातील पूरग्रस्त गरजू नागरिकांपर्यंत देण्याचे निश्चित झाले. हरकुळ येथील तरुण शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेली मदतही १०० इडियट्स ग्रुपकडे सुपूर्द करण्यात आली.
मालवण देऊळवाडा नारायण मंदिर येथे ग्रुप सदस्य एकत्र आले. यावेळी अमोल गोलतकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मदत घेऊन दोन गाड्या रवाना झाल्या. कै. केदार गावकर, कै. प्रमोद बाळू गोसावी, कै. नीलेश केळुसकर, कै. महेश गिरकर, कै. मोहन रेडकर या मालवण शहरातील कायम समाजकारणामध्ये सक्रिय असलेल्या आमच्या मित्रांच्या स्मरणार्थ ही मदत रवाना करत असल्याचे ग्रुप ॲडमिन सिजर डिसोजा व सदस्यांनी सांगितले. यावेळी युवराज चव्हाण, मयूर पाटणकर, गणेश मांजरेकर, प्रसाद परुळेकर, तमास अल्मेडा, मंदार गावडे, विनायक पराडकर, नितेश हळकर, मंदार गावडे, नुपूर तारी व १०० इडियट्स ग्रुप, मालवणचे कार्यकर्ते उपस्थित होते.