रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातून २१,०८० विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल १०० टक्के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १.३१ टक्क्याने जिल्ह्याच्या निकालात वाढ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १०,०८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत १.०७ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे. गेल्या नऊ वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालाच्या टक्केवारीत रत्नागिरीपेक्षा बाजी मारत अव्वल स्थान मिळवले होते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापनानुसार दोेन्ही जिल्ह्यांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
मुला-मुलींचे समान यश
रत्नागिरी जिल्ह्यातून १० हजार ५७४ मुलगे परीक्षेला बसले होते, हे सर्व मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. तसेच जिल्ह्यातून १०,३२६ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या, या सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुला-मुलींनी परीक्षेत शंभर टक्के यश संपादन केले असून, दरवर्षी निकालात झेंडा उंचावण्याचे श्रेय मुलींनी राखले होते. मात्र, यावेळी मुला-मुलींनी समान पातळीवर यश मिळवले आहे.
पुनर्परीक्षार्थींचा ९२.१३ टक्के निकाल
रत्नागिरी जिल्ह्यातून ७२६ पुनर्परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा शाळांच्या माध्यमातून घेण्यात आल्या. ७२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, पैकी ६६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९२.१३ टक्के लागला आहे. अंतर्गत मूल्यमापनाचा नियमित व पुनर्परीक्षार्थ्यांना चांगलाच फायदा झाला. याचवेळी ५७ विद्यार्थी मात्र अनुत्तीर्ण झाले आहेत.
शंभर टक्केच्या ४१९ शाळा
रत्नागिरी जिल्ह्यात ४१९ शाळा असून, ७३ परीक्षा केंद्र होती. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथमच जिल्ह्यातील सर्व शाळांना एकाचवेळी शंभर टक्के निकाल लावण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.
पालक/विद्यार्थी नाराज
स्मार्टफोनमुळे बहुतांश घराघरात इंटरनेट सुविधा असल्यामुळे सकाळपासूनच निकाल पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर आपला क्रमांक पाहण्यासाठी प्रत्येकाची घाई सुरू होती. परंतु, साडेचार वाजले तरी साईट सुरू न झाल्याने विषयनिहाय गुण पाहता न आल्याने विद्यार्थी हिरमुसले होते.