शिवाजी गोरेदापोली : तालुक्यातील उबर्ले गावात एलियनसदृश्य कातळशिल्प आढळल्याने हे गाव चर्चेत आले आहे. हे कातळशिल्प १० हजार वर्षापूर्वीचे असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. अशा प्रकारचे कातळ शिल्प अन्यत्र कोठेही आढळलेले नसल्याचेही अभ्यासकांनी सांगितले. उंबर्ले गावात 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच दहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो. बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले.रहस्य उलगडणारआजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीतदापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.
Ratnagiri: दापोलीत आढळले दहा हजार वर्षापूर्वीचे कातळशिल्प, एलियनसदृश्य कातळशिल्पाबाबत कुतूहल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 4:36 PM