रहिम दलालरत्नागिरी : गावाच्या विकासाचा गाढा हाकणाऱ्या जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींचा कारभार आजही जुन्या इमारतीतून हाकला जात आहे. धाेकादायक बनलेल्या या इमारतींच्या छायेखाली धाेक्याची टांगती तलवार घेऊन कामकाज केले जात आहे. जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धाेकादायक बनल्या आहेत. माेडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत अनास्था पाहायला मिळते.जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या या ग्रामपंचायतींच्या धोकादायक बनलेल्या इमारतींकडे शासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. या ग्रामपंचपायतींच्या माध्यमातून गावे, वाड्यांमध्ये विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष दुरुस्ती, यशवंत ग्रामसमृद्धी योजना, ग्रामसचिवालय योजना, घरकुल योजना व अन्य योजनांचा समावेश आहे.ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांमुळे विविध विकासकामे करीत असतानाच ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आराखडा ग्रामपंचायतींमध्ये तयार करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात येत आहेत. त्यातून स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झालेला आहे.ग्रामीण भागात विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती अनेक वर्षांपूर्वीच्या आहेत. या इमारती वापरणे अतिधोकादायक असल्याचा निष्कर्ष संबंधित विभागाकडून काढण्यात आला आहे. धोकादायक असलेल्या काही ग्रामपंचायतींच्या इमारतींचे छत काेसळले आहे. तर, काहींचे छप्पर दुरुस्ती करणे, स्लॅबना गळती, भिंतींना तडे गेले आहेत. लादी बसविणे, खिडक्या, दरवाजे दुरुस्ती अशी स्थिती ग्रामपंचायतींच्या इमारतींची झाली आहे.बहुतांश ग्रामपंचायतींच्या छपरांची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळा तर कसाबसा तग धरून काढावा लागतो. मोडकळीस आलेल्या ग्रामपंचायतींच्या कार्यालयामध्ये पावसाळ्यात कागदपत्रे भिजल्याने जुनी आणि महत्त्वाची कागदपत्रे खराब होत आहेत. त्यासाठी नवीन इमारतींची मागणीही ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेली आहे.मात्र, गावच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाच नवीन इमारतींच्या बांधकामासाठी शासनाने निधी नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, ग्रामपंचायतींच्या इमारतींची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
धोकादायक इमारतीतालुका - इमारतीमंडणगड ६दापोली ३१खेड १०चिपळूण ५गुहागर १७संगमेश्वर ९लांजा ११राजापूर १५
पालकमंत्र्यांच्या तालुक्यात सगळ्याच सुस्थितीतजिल्ह्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. विशेष बाब म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीची इमारत धोकादायक नाही. सर्वच ग्रामपंचायतींच्या इमारती सुस्थितीत आहेत.