रत्नागिरी : ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून १५७ जण दाखल झाले आहेत. त्यापैकी ५१ जणांची कोरोना चाचणी झाली असून, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आहे. मात्र, १०६ जणांचा अजूनही आराेग्य विभागाला शाेध लागलेला नाही. या सर्वांचा शाेध घेण्याचे काम सुरु असून, त्यांचा शाेध लागत नसल्याने आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान उभे राहिले आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला हाेता. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येत हाेती. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट जीवघेणा असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत असून, परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम पाळण्यात येत आहेत.
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत परदेशातून ७४ नागरिक आले होते. मात्र, शनिवारी त्यामध्ये आणखी ८३ नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या १५७ झाली आहे.
परदेशातून जिल्ह्यात दाखल झालेले नागरिक विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची तत्काळ शासनाकडे नोंद करण्यात येत आहे. त्यानंतर त्या लोकांची माहिती जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दाखल झालेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा धडपडत आहे. ज्या गावामध्ये परदेशातून नागरिक आले आहेत. त्या गावाच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना कळविण्यात येत आहे. तेथून परदेशातून आलेल्या नागरिकांशी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत परदेशातून आलेल्या ५१ लोकांशी संपर्क साधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मात्र, जिल्ह्यात दाखल झालेल्या १०६ जणांचा अद्यापही शाेध लागलेला नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा शाेध घेण्याचे आव्हान आता आराेग्य यंत्रणेसमाेर आहे. याबाबत त्या-त्या तालुक्यातील आराेग्य यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. यातील काही नागरिकांचे माेबाईल नंबर बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे मुश्किल झाले आहे. त्यांचा शाेध घेऊन त्यांचे तत्काळ विलगीकरण करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
मंडणगड ०८
दापोली २६
खेड २९
चिपळूण ३५
गुहागर ०२
संमेश्वर १०
रत्नागिरी ३४
लांजा ०१
राजापूर ०३
परदेशातून आलेले नागरिक
दुबई - २०
कतार- ०८
कुवेत- ०५
ओमान ०४
बहारीन ०३
अमेरिका ०३
सऊदी अरेबिया ०२
आबूधाबी ०१
शारजा ०१
साऊथ आफ्रिका ०१
युके ०१
चेन्नई ०१
सिंगापूर ०१
एकूण ५१