राजापूर : गेले काही दिवस राजापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असतानाच शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १०६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०६ झाली असून, एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४१४१ वर पोहोचला आहे.
तालुक्यात शनिवारी आढळलेल्या १०६ रुग्णांमध्ये ७५ ॲंटिजनचे, तर ३१ रुग्ण आरटीपीसीआर तपासणीतील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांनी दिली आहे. या रुग्णांमध्ये ३६ रुग्ण हे केळवली मटखुर्दवाडी येथे आढळले आहेत. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आरोग्य विभागाने राबविलेली लसीकरण मोहीम व वाडीवस्तीवरील अँटिजन तपासणी यामुळे काहीअंशी रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली होती. नियमित कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५० च्या आत आला होता. गुरुवारी १ जुलैला ४० कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र, शुक्रवारी एकाच दिवशी १०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तालुक्यातील कोरोना हॉटस्पॉट गावांची संख्या पाचवर पोहोचली आहे. सद्य:स्थितीत १४ जण रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये, २४ जण धारतळे येथे, तर आठजण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ६०२ गृह अलगीकरणामध्ये, ३ जिल्हा बाहेरील रुग्णालयात, ४१ ग्रामपंचायत पातळीवरील विलगीकरण केंद्रात ११ ओणी कोविड रुग्णालयात, तर रायपाटण कोविड रुग्णालयात तीनजण उपचार घेत असल्याचे डॉ. परांजपे यांनी सांगितले. तालुक्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या चांगली असून, ४१४१ रुग्णांपैकी ३२७५ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. तालुक्यात आजपर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे.